वाशिम : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 च्या मतदानाच्या दिवशी लोक राजकीय कारणावरुन विनाकारण भांडण तंटे करतात, त्याचे रुपांतर मोठया भांडणात किंवा घटनेत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते. या सर्व बाबींना प्रतिबंध घालण्यासाठी व निवडणूक प्रक्रीयेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या उद्देशाने निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोणातून निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता संबंधित मतदान केंद्र परिसरात 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6 ते 30 जानेवारी 2023 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे.
हे आदेश वरील कालावधीत लागू राहणार असल्यामुळे 28 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजतानंतर राजकीय पक्षांना प्रचार सभा घेता येणार नाही. निवडणूकीच्या संबंधाने धार्मिक स्थळांचा उपयोग करता येणार नाही. आचार संहितेच्या संपूर्ण काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरात निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही. मतमोजणीच्या ठिकाणी 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. असे वृत्त प्राप्त झाल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले.