तालुक्याच्या पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव येथील जंगल परिसरात गेल्या आठ दिवसांत पाच जनावरे वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर पशुपालक शेतकऱ्यांवर संकट ओढवले. खरीप हंगामासाठी बैल कुठून आणावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.नवरगाव येथील दादाजी दशमुखे यांच्या मालकीची संकरीत दुधाळ गाय, लुमाजी चुधरी, रामदास म्हस्के व देवेंद्र भोयर तसेच अन्य एका शेतकऱ्याचा बैल अशी एकूण पाच जनावरे गेल्या आठ दिवसांत वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. यामध्ये एक गाय व चार बैलांचा समावेश आहे.
या घटनेमुळे दादाजी दशमुखे यांचे ४० हजारांचे, लुमाजी चुधरी व रामदास म्हस्के यांचे प्रत्येकी ३० हजारांचे, तर देवेंद्र भोयर व अन्य एका शेतकऱ्याचे प्रत्येकी ३५ हजारांचे नुकसान झाले. सदर घटनांचा पंचनामा वनपालांनी केला. पंचनामाप्रसंगी ईश्वर आवारी, देवेंद्र भोयर, कमलेश बोकडे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे, काही दिवसांतच खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू होतील. यासाठी बैल कुठून आणावे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.