आपल्याला मतदान करायचे तर ते सकाळी लवकर गर्दी नसतांना,उन्हाचा कडाका टाळून करायचे असे ठरवून आज आम्ही उभयता ल.रा.तो.वाणिज्य महाविद्यालयातील मतदान केंद्रावर गेलो. मी मतदान उरकून केंद्राच्या आवारातील वृक्षाखाली आमच्या गृहमंत्र्यांची वाट बघत उभा होतो.इतक्यात माझ्यासमोर वृक्षावरून आपला राज्यपक्षी हरियल खाली पडला. थोड्या वेळ त्याने उठायचा प्रयत्न केला पण त्याला उठता येत नव्हते म्हणुन मग मी जवळ जाऊन बघितले.तेव्हा लक्षात आले की हा जायबंदी आहे.मग त्याला उचलले तर काय तो किशोरवयीन जीव उडण्याचा सराव करतांना पायाचा रेटा देऊन उडाला असावा, झेप जमली नसेल म्हणुन तो धपकन खाली पडला नि त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे असे दिसले. त्याला उचलून घेतले.
२. तेथुन परत येतांना कॉलेजच्या प्रांगणात सेल्फी पॉईंट होता. तेथे फोटो काढू यात म्हणुन गेलो तर काय अकोल्यातील जुन्या शहरातील हौशी वृत्तपत्र छायाचित्रकार अजय जागिरदार भेटले. त्यांनी माझ्या हातातील पक्षी बघून राजकिय पक्षांच्या गर्दीत तुम्हाला बरा पक्षी गवसला म्हणुन फोटो काढू यात असा मानस व्यक्त केला. इतक्यात तेथे निवडणुक कार्याची तपासणी करायला आलेले अकोल्याचे जिल्हाधिकारी श्री अजित कुंभारसाहेब ह्यांनी माझ्या जवळील पक्षी बघुन आस्थेने,उत्सुकतेने पक्षाविषयी विचारपुस केली. ते क्षण अजय जागिरदारने नेमके टिपले.
३. मग मी त्या जीवाला घरी आणुन पशुवैद्यक डॉ.मंजुळकर यांच्या कडे नेले.पक्षाचा एक पाय फ्रॅक्चर असल्यामुळे त्यांनी बॅंडेज बांधुन त्याची रवानगी स्थानिक सिव्हिल लाईन भागातील पक्षी आधार गृहामध्ये करण्यास सांगितले.
४. काय योगायोग पहा राजकिय पक्षांच्या रणधुमाळीत राज्यपक्षाने आपले लक्ष वेधावे हे काही वेगळेच.