वाशिम - सध्या राज्यात आंबेडकरवादी राजकारणामध्ये स्पष्टपणे उदासीनतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मागील अनेक निवडणुकांमध्ये या चळवळीला अपेक्षित यश लाभलेलं नाही. या अपयशाची विविध कारणं असली, तरी प्रमुख कारण म्हणजे आपसातील वैमनस्य, संघर्ष, आणि नेतृत्वातील विसंवाद. यामुळे आंबेडकरवादी जनतेमध्ये निराशा आणि संभ्रमाचे वातावरण आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी विविध आंबेडकरवादी विचारवंत, अभ्यासक, आणि शिक्षित वर्ग एकत्र येऊन विचारमंथन करत आहेत. या पार्श्वभूमीवर १४ जून रोजी नागपूर येथे ‘रिपब्लिकन फेडरेशन’ या नव्या राजकीय संघटनेची स्थापना करण्यात आली. ही संघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वप्रणालीवर आधारित असून सर्व आंबेडकरवाद्यांना एकत्र आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या पुढाकाराचा एक भाग म्हणून शनिवार, २१ जून रोजी दुपारी १२ वाजता, बुद्ध विहार, अशोक वाटिका (अकोला नाका) येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस नागपूर येथील रिपब्लिकन फेडरेशनचे मुख्य संयोजक मिलिंद पखाले हे विशेष उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीचे आयोजक जे. एस. शिंदे, माधव डोंगरदिवे, प्रकाश खडसे, अरविंद उचित, समाधान अवचार, अनंत तायडे, सिताराम कांबळे आणि भालचंद्र तायडे यांनी वाशिम व परिसरातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.