शिवसेना शिंदे गटाचे वाशीम शहर प्रमुख डॉ. विशाल सोमटकर यांनी १७ जून रोजी आपल्या शहरप्रमुखपदासह शिंदे सेनेच्या सक्रीय सदस्याचाही राजीनामा शिवसेनेच्या पक्षनेत्या आमदार भावनाताई गवळी यांचेकडे दिला आहे. डॉ. विशाल सोमटकर यांच्या राजीनाम्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
डॉ. विशाल सोमटकर हे राष्ट्रीय काँग्रेसच्या सेवादलाचे वाशीम जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या पक्षात असलेल्या गटबाजीला कंटाळून डॉ. विशाल सोमटकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देवून राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या उपास्थितीमध्ये मुंबईला ७ फेब्रुवारी २०२५ रोजी शिंदेसेनेमध्ये प्रवेश घेतला होता.
डॉ.विशाल सोमटकर यांचा जिल्हयात असलेला दांडगा जनसंपर्क आणि ते कुशल संघटक असल्याने वाशीम जिल्हयातील हजारापेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश घेवून वाशीम जिल्हयात शिंदेसेनेची भरभराट केली होती. पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कार्याची दखल घेवून डॉ. विशाल सोमटकर यांना १४ एप्रिल २०२५ रोजी वाशीम शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली.
डाॅ. विशाल सोमटकर यांनी पक्षनेतृत्वासह, पक्षनेत्या आमदार भावनाताई गवळी यांच्या आदेशाचे पालन करून शहरामधील जनसामान्यांचे प्रश्न सोडवून सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच आगामी वाशीम पालिकेसह जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीत शिंदेसेनेचे बहुसंख्येने सदस्य निवडूण आणण्यासाठी पक्षबांधणीचे कार्य जोमाने सुरु केले होते.
डॉ विशाल सोमटकर यांनी १७ जून २०२५ रोजी पक्षनेत्या आमदार भावनाताई गवळी यांना दिलेल्या राजीनाम्यामध्ये त्यांना पक्ष, संघटनेच्या कामासाठी वेळ नसल्याचे नमूद करुन त्यांनी वैयक्तिक कारणामुळे शिंदेसेनेच्या वाशीमशहरप्रमुख पदासह पक्षाच्या सक्रीय सदस्याचा राजीनामा स्वीकारण्याबाबत विनंती केली आहे.