गडचिरोली, २९ मे २०२५ :
येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जनावरांची वाहतूक आणि कत्तल यासंदर्भात कायद्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विलास गाडगे यांनी केले आहे. सन २०२५ मध्ये बकरी ईद दिनांक ७ जून रोजी साजरी होणार असून या दिवशी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कुर्बानी केली जाण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने संबंधित व्यक्तींना कायदेशीर तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
जनावरांची वाहतूक करणाऱ्यांनी वाहने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १२५-ई नुसार आवश्यकतेनुसार बांधकामात बदल करून त्यासाठी संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना प्राप्त करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
'प्राण्यांच्या अमानुषतेपासून संरक्षण (अन्नासाठी जनावरांची वाहतूक) नियम, २००१' मधील नियम ९६ नुसार, वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण तसेच भारत सरकारच्या प्राणी कल्याण मंडळ आणि केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या अधिकारी किंवा संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र मिळालेले नसल्यास, वाहतूक न करण्याची जबाबदारी वाहतूकदारावर आहे.
तसेच, 'प्राण्यांच्या अमानुषतेपासून संरक्षण अधिनियम, १९६०', 'प्राण्यांची वाहतूक नियम, १९७८' व 'पायी जनावरांची वाहतूक नियम, २००१' या सर्व कायदे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
वरील कायद्यांचे उल्लंघन झाल्यास, संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ही सूचना जनावरांची वाहतूक करणारे, व्यापारी व सामान्य नागरिक यांच्यासाठी असून सर्वांनी शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विलास गाडगे यांनी केले आहे.
०००
आपल्या प्रतिक्रिया द्या....