कारंजा : सर्वसामान्य नागरिक जनता जनार्दन पत्रकारांकडून फार मोठया आशा अपेक्षा बाळगून असतात. देशातील लोकशाही आणि समाजव्यवस्था केवळ आणि केवळ पत्रकारामुळे टिकून राहू शकते. लोकशाहीचे तिन आधारस्तंभ - संसद, राष्टपती आणि सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायव्यवस्था हे शासनाचे मुलभूत अंग आहेत. मात्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ "पत्रकार"हा शासनाच्या अंतर्भूत नसतांना, पूर्णतः खाजगी आहे. स्वतंत्र आहे. तो कोणत्याही बंधनात नसल्यामुळे पत्रकाराची निःक्ष्पक्ष, निःस्वार्थ व सेवाभावी म्हणून स्वतंत्र ओळख असते."पत्रकार" आहे म्हणून समाजातील अन्याय, अत्याचार, गुन्हेगारीवर वचक आहे. "पत्रकार" आहे म्हणून समाजाला न्याय मिळू शकतो. "पत्रकार" आहे म्हणून शासनाला लोकहिताचे मोठ मोठे निर्णय घ्यायला तो भाग पाडतो. "पत्रकार"आहे म्हणून समाजाला न्याय मिळतो. "पत्रकार" आहे म्हणून लोकहिताच्या विविध कल्याणकारी योजनांना मंजूरी मिळते."पत्रकार" आहे म्हणून शासन प्रजासत्ताक स्वातंत्र्य टिकून आहे. लोकशाही टिकून आहे. "पत्रकार"हा क्रांति घडविणारा क्रांतिवीर, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा स्वातंत्र्याविर, देश चालविणारा प्रशासक, न्याय मिळवून देणारा न्यायाधिश, समाजासाठी झगडणारा खरा सैनिक, समाजाच्या पालनपोषणाची जबाबदारी शासनाकडून पूर्ण करून घेणारा पोशिंदा असतो. लक्षात ठेवा "पत्रकार"नसता तर लोकशाहीचा आवाज बुलंद करणारा, नागरिकांचा आवाज उचलणारा, जनतेचा कुणीही वाली नसता व त्यामुळे सर्वत्र हुकूमशाही आणि असंतोषाला ऊत आला असता. मात्र आजकाल आम्ही पहातो काही तथाकथित "पत्रकार" लोकशाहीतील जनहिताची कामे बाजूला सारून आणि सच्चाईचा गळा घोटून, एखाद्या राजकिय पक्षाची, एखाद्या भांडवलदाराची किंवा गुंडप्रवृत्तीची गुलाम होऊन, कुणाला धमक्या देणे. एखाद्याला अक्षरशः ब्लॅकमेल करणे. अगदी सांगायचेच झाले तर खंडण्या वसूल करणे,असले प्रकार करायला लागलेले आहेत. तेव्हा शासनानी आणि जनता जनार्दनांनी लक्षात घेणे जरूरी आहे की, मुळात हे "पत्रकारच" नाहीत. तेव्हा अशा पत्रकारितेचा बुरखा पांघरलेल्या तोतया पत्रकाराचे बुरखे फाडलेच पाहीजे. असे तोतये पत्रकार पत्रकारितेला कलंक फासत आहेत. तेव्हा शासनाने व मुख्यतः समाजव्यवस्थेने अशा तोतया पत्रकाराचे पितळ उघडे पाडले पाहिजे. यांच्या मिथ्या धमक्यांना बळी न पडता यांचेवर सक्त कार्यवाही व्हायला हवी. खरा "पत्रकार" हा सच्चा देशभक्त असतो. तो कधीही कुणाशी स्पर्धा किंवा ईर्षा, द्वेष, आकस, सुडबुद्धीने वागत नसतो. "सच्च्चा पत्रकाराने केवळ आणि केवळ समाजसेवेचे व्रत घेतल्यामुळे त्याला कोणताच स्वार्थ नसतो. समाजसेवेचे व्रत म्हणूनच तो पत्रकारितेचा छंद जोपासत असतो." तर पत्रकार हा मानवतावादी, सेवाव्रती,निष्कलंक, नि:ष्पक्ष, निःस्वार्थ राहून, देशसेवा आणि समाजसेवा करण्याकरीता अगदी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून, कौटूंबिक स्वार्थ बाजूला सारून, स्वतःच्या जीवावर उदार होत, तळहातावर प्राण घेऊन पत्रकारिता करीत असतो. तेव्हा अशा स्वाभिमानी - निःस्वार्थी - निष्पक्ष पत्रकाराच्या पाठीशी उभे राहून कोण सच्चा कोण तोतया हा ओळखून समाजाने अशा पत्रकारांना सहकार्य केले पाहीजे. व निःस्वार्थ पत्रकारिता बळकट करून देशातील समाजव्यवस्था टिकवून ठेवली पाहीजे.असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ पत्रकार साहित्यीक, सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी पत्रकाराविषयी आपले परखड मत मांडताना मत व्यक्त केले आहे.