येथील सामाजिक कार्यकर्ते व सर्वांच्या सुपरिचित असलेले, ऍडव्होकेट संदेश मा जिंतुरकर यांच्या सासूबाई सौ सुषमा ( उज्वला) सुधीरकुमार मिश्रीकोटकर यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. स्व सुषमा सुधीरकुमार मिश्रीकोटकर देऊळगाव राजा, ह मू कारंजा लाड यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. सौ गुंजन संदेश जिंतुरकर या त्यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. स्व सुषमा सुधीरकुमार मिश्रीकोटकर या अत्यंत दानशूर व धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांनी अनेक धार्मिक विधान व तीर्थयात्रा संपन्न केल्या होत्या. सौ गुंजन व संदेश यांनी त्यांची खूप सेवा सुश्रुषा केली. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्या प्रमाणे दिशा आय ग्रुप व्दारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती यांनी येथे येऊन त्यांची मरणोत्तर नेत्रदान प्रक्रिया पूर्ण केली. त्यासाठी दिशा आय ग्रुप चे सचिव सप्नील गावंडे व हिमांशू बंड अमरावती हे कारंजा आले होते. यावेळी डॉ शार्दुल डोणगावकर, डॉ विजय जवाहरमलानी, डॉ सुशील देशपांडे, आशिष बंड, प्रज्वल गुलालकरी, आमोद चवरे इत्यादी दिशा आय ग्रुप कडून उपस्थित होते. स्व सुषमा सुधीरकुमार मिश्रीकोटकर यांनी मरणोत्तर नेत्रदान करून आपल्या सामाजिक जाणिवेचा परिचय सर्वांना दिला...