सर्व राजकिय पक्षांना लघुपत्रकारांच्या वतीने विनंतीवजा आवाहन .!!
आमचे वृत्तपत्रांवर प्रेम करणाऱ्या, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, सर्वच सामाजिक संघटना व मुख्य म्हणजे राजकिय पक्ष नेतेमंडळी , प्रसिद्धी प्रमुख आणि कार्यकर्त्यांना आमची हात जोडून, कळकळीचे आणि विनम्र आवाहन आहे की, आमच्याकडे बातमी पाठवितांना, मोबाईल वर टाईप करूनच बातमी व कार्यक्रमाचे फक्त दोन फोटो पाठवावेत . (पिडीएफ कॉपी, पेजमेकर फाईल,फोटोकॉपी, इतर पेपरचे कात्रण स्विकारल्या जाणार नाही.) शिवाय आपल्या स्वाक्षरीची एक हस्तलिखित स्थळप्रत आमचेकडे पाठवावी.तसेच बरेच राजकिय पक्ष नेते/कार्यकर्ते,नगरसेवक,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य बातम्या पाठवितात व बातमी प्रकाशित झाल्यानंतर कोणत्याच पत्रकारांचे साधे दोन शब्दांनी आभार सुद्धा मानीत नाहीत. उलटपक्षी बातमी जर छापून आली नाही तर आम्हाला म्हणजेच सर्वच पत्रकारांना, भ्रमणध्वनीवर वारंवार फोन करून अक्षरश: त्रस्त करीत असतात. तसेच "विचार करण्यासारखे हे आहे की,जेव्हा ही नेतेमंडळी एखादा कार्यक्रम घेतात तेव्हा मंडप, लाऊडस्पिकर हार तुरे, शाल श्रीफळ, चहा नास्ता, जेवणावळी करीता यांच्याकडे पैसे असतात." परंतु "एका रस्त्यावरच्या सामान्य कार्यकर्त्याचा उदो उदो करून, त्यांना ग्रामपंचायत, नगरपंचायत, विधानसभेत, लोकसभेत नेऊन खासदार.करणार्या, "लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला-पत्रकाराला " द्यायला मात्र यांचेकडे पैसे नसतात. म्हणजेच तुम्हाला घडविणारा, तळागाळातला, ग्रामीण भागातला, किंवा आमदनी नसणाऱ्या मुर्तिकाराला जाहिरात द्यायला मात्र पैसे नसतात. केव्हा केव्हा तर असे विचार येतात यांच्या ठाई आपणच कमनशिबी आहो का पण कम नशीबी आम्ही तर नक्कीच नाही कारण आम्ही आज पत्रकार आहोत, कालही पत्रकारच होतो, उद्याही पत्रकारच आणि मृत्युपरांत ही पत्रकारच राहणार ही काळ्या दगडावरची रेखाटलेली पांढरी रेघ आहे पण तुम्ही एका चौकटीत पाच वर्षा करीता रहाता. त्यामुळे आम्हाला एकदा मिळालेला पत्रकारितेचा सन्मान करायला शिका. काही नेते तर जाहिरात स्वतःहून पाठवतात आणि पत्रकार बिल घेऊन गेला की,आठ दिवसानी या ..!, उद्या या.. अशाप्रकारे त्रस्त करून सोडतात.मागे तर घडलेली सत्य घटना सांगतो. मागील वर्षी आम्ही पहिल्यादांच एका नवनिर्वाचित आमदाराला, "आमच्या राज्यस्तरिय पत्रकार अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याकरीता" मोठ्या आदराने व हौसेने बोलविले.एका तारांकित हॉटेलमध्ये जेवणावळीसह कार्यक्रम ठेवला. संगीत मेजवानीसह पाहुण्यांचे स्वागत, पुरस्कार वितरण झाले. व हे प्रमुख अतिथि म्हणून महाशय बोलायला लागले. त्यांच्या भाषणाचे थोडक्यात मुद्दे असे होते की, " ...... आमचा वाढदिवस किंवा एखादा राष्ट्रीय सण असला की, एक नाही छपन्न पत्रकार उठतात. कधीही पहाण्यात न आलेल्या वृत्तपत्रात ठळकपणे अगदीच छोटीसी किंवा एका पानाची जाहिरात छापून, दहा पाच पेपर, सोबत बिल घेऊन येतात आणि दहा हजार पंधरा हजाराची मागणी करतात तेव्हा "काही पत्रकारांनी" (अर्थात तुम्ही नव्हे तर दुसरे काही) उचलेला हा उद्योग तुम्ही पत्रकारांनी बंद करावा ... तुमच्या अधिवेशनाला (हात जोडीत शुभेच्छा ! ) जय हिंद !! जय महाराष्ट्र !!!" आणि महाशय लगेच लगबगीने दुसरीकडचा सत्कार समारंभ करून घ्यायला निघूनही गेले. आम्हा पत्रकाराना बोलायला काही संधीच नाही, त्यावेळी खरोखरीच माझ्या तळपायातली मस्तकात गेली होती. मला त्यावर खूप काही भाष्य करायचे होते. परंतु ऐकून घ्यायला आम्हा पत्रकारांशिवाय कुणीच नव्हते. या घटनेने अवघे सभागृह सुन्न झाले होते. म्हणजे "तुम्हाला प्रजासत्ताक लोकशाहिचा चौथा स्तंभ पत्रकार हा एवढा चिल्लर वाटतो का ?" "अहोरात्र जीवावर उदार होऊन आणि स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून, तुमच्या सेवेसाठी, समाजाच्या डोळ्यातील अश्रू टिपून आपल्या लेखणीद्वारे शासनापर्यंत पोहचविण्याकरीता नि:स्वार्थपणे,दंगे असो की कफ्यु, महामारी असो की कोरोना, अपघात असो की अग्निकांड किंवा महापूर कशाचीही पर्वा न करता केवळ आणि केवळ समाजसेवेत गर्क असतो. तो तुम्हाला एवढा कमजोर आणि किरकोळ वाटतो का ? लक्षात ठेवा "जसा तो तुम्हाला घडवू शकतो, तसाच वेळ आली तर तो तुम्हाला खूर्चितून खालीही खेचू शकतो." पण काही कार्यकर्ते मात्र आम्हा पत्रकारांना याविरुध्द सहकार्याची आणि आमच्या परिस्थितीचीही जाणिव ठेवून असतात.असाच एक किस्सा पण सकारात्मक असा, माझे बाबतीत कारंजा शहरात घडलेला तुम्हाला सांगतो, त्यावेळी "कारंजाचे नगराध्यक्ष माझे मित्र दत्तराजजी डहाके हे होते."26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची, नगर पालिकेची जाहिरात मी माझ्या साप्ताहिक जरकारंजेला छापली. 26 जानेवारीला गावात पेपर वाटले. मुख्याधिकाऱ्याच्या हातात दिले. एका महिन्यांनी जाहिरात बिल घेऊन नगराध्यक्षांकडे गेलो . नगराध्यक्षांनी मंजूरी स्वाक्षरी करून मला तत्कालिन मुख्याधिकार्यांकडे पाठवले. मुख्याधिकाऱ्यांनी जसे काही त्यांना खिशातून मला 2000/-रु द्यायचे होते असे समजून बिल नामंजूर केले. मी आलो त्यांचे नामंजूर हस्तलिखित व कोबंड दाखविले. माझे मित्र दत्ताभाऊ लगेच तावातावाने उठले बिल टाचलेले पेपर घेऊन व मला माझा हात पकडून सोबत घेऊन मुख्याधिकार्याकडे गेले. पेपर बिलाच्या शंभर चिटोऱ्या करून मुख्याधिकाऱ्याच्या तोंडावर फेकल्या. खिशात हात घातला. 100/- रुपयाच्या गड्डीमधून 30 नोटा काढून मला दिले व सांगीतले. यानंतर नगरपालिकेची बातमी छापायची नाही. मग मात्र मुख्याधिकार्यांचा मुखवटा पाहण्यासारखा झाला. ते गयावया करू लागले. तोपर्यत दत्ताभाऊ कॅबिन बाहेर पडले होते. ते क्षण आठवले की मला आजही दत्ताभाऊंचे मित्रप्रेम पाहून डोळ्यात अश्रू दाटून येतात. धन्य ते दत्ताभाऊ डहाके !! आणि धन्य त्यांचे कार्य ! मोठ्या पेपरचे पत्रकार, जाहिरातीच्या तुटपुंज्या मिळकतीवर जगत असतात . मोठ्या वृत्तपत्राचे मालक संपादक त्यांना वर्षाला जाहिरातीचे 10 लाख ते 20 -25 लाखाचे टार्गेट किंवा जाहिरातसिमा ठरवून देत असतात. (वृत्तपत्र चालवीणे म्हणजे पोरखेळ नव्हे)तर लघुपत्रकार स्वखर्चाने वृत्तपत्र छपाई करीत असतात.आज आपण पहाता की, संगणकाचे टंकलेखकाचे म्हणजेच पेपर रचनाकाराचे दर वाढलेत . विज बिलं वाढली .कागदाचे दर भरमसाठ वाढलेत . छपाईच्या शाईचे दर वारेमाप वाढलेत.छपाई करणाऱ्या मुद्रकाचे दर वाढलेत. एका जाहिरातीकरीता, मागणी, वृत्तपत्रवाटप, पार्सलखर्च व नंतर बिलाकरीता येरझारा ....पत्रकारांना किती कराव्या लागतात ? तेव्हा तुम्ही तुम्हाला प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकाराचा, त्याच्या घरादाराचा "नव्हे नव्हे त्याच्या कुटूंबाचा विचार करायला नको का ?"खेडेप्रधान देशातील एका खेड्यातून, केवळ समाजकार्याची आवड म्हणून पत्रकारिता क्षेत्रात योगायोगाने आलेल्या माणसाचा" त्याने तुमच्या करीता स्विकारलेला मानवधर्म बघून तुम्ही सुद्धा, " पत्रकारिता परमो धर्मः॥" समजायला नको का? मागे तर आम्हा विदर्भातील पत्रकारांचे भिष्मपितामह आणि माझे एकेकाळीचे गुरुवर्य दैनिक महासागरचे संपादक मा श्री श्रीकृष्णजी चांडक यांनी, नागपूर येथील, "महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात " आम्हा तळागाळातल्या ,ग्रामीण व लघु पत्रकारांना जाहिररित्या स्पष्टपणे सांगीतले की, तळागाळातला खरा मेहनती पत्रकार टिकला पाहिजे, त्याचे कुटूंब जगले पाहिजे याकरिता पत्रकारांनी सुध्दा आता कोठेतरी जागे झालं पाहिजे, लघुपत्रकारांनी तरी वृत्तपत्र छपाईचा आणि कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा खर्च बातम्या देणाऱ्यांकडून काढायलाच हवा . "एक बातमी - एक जाहिरात" या तत्वाने तुम्ही पुढे जालं तरच कुटूंब जगवाल. " या अधिवेशनाला पूर्व आणि पश्चिम विदर्भातीलच प्रत्येक जिल्ह्यातून नव्हे तर कारंजा शहरातून सुद्धा, म.रा.मराठी पत्रकार संघाचे अनेक पत्रकार विदर्भ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, विदर्भ सचिव निलेशभाऊ सोमाणी, जिल्हा ग्रामिण पत्रकार संघाचे सुनिलभाऊ फुलारी यांच्या नेतृत्वात हजर होते. हा ...एक आठवले म्हणून सांगतो, तुम्हाला माहिती आहे का ? युद्धप्रसंगी, दंगा कर्फ्यु मध्ये, बर ते जाऊ द्या . गेल्या दोन वर्षात,कोरोना महामारी काळात तुम्ही नजरकैदेत आणि बायका लेकरासोबत स्वतःच्या घरात असतांना, तुमच्या करीता वृत्तसंकलन करीत असतांना किती पत्रकार मृत्यु पावले. व शहिद झाले ? त्यांना कोरोनायोध्दयाचा दर्जा मिळाला काय ? आणि किती लोकांना महाविकास आघाडी असो किंवा केंद्रातील भाजपा सरकार त्यांनी आर्थिक मदत दिली ? आणि आमच्याकरीता किती मंत्री, खासदार किंवा आमदार, नगरसेवकांनी किमान एका महिन्याचे तरी वेतन देऊन आम्हाला दिलासा देण्याचा, शहीद पत्रकाराच्या बायका लेकराचे अश्रू पुसले. म्हणूनच मला एकच सांगायचे की, हे कुण्या "अहिर्या-गहिऱ्या-नथ्थू-खैऱ्याचे काम नसून केवळ बुद्धीवंत, ज्ञानवंत, कलावंत, निष्ठावंत, हाडाच्या समाजसेवक पत्रकाराचेच काम होय" तेव्हा आता तुम्हाला शेवटी एकच विनंतीवजा आवाहन करू इच्छितो की, बातमीदार,जाहिरातदार नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यानी एकच लक्षात घ्यावे की, जो पेपरचा अंक आम्हाला घरात दहा बारा रुपयाला पडतो तरीसुध्दा तोटा सोसीत ,तो पेपर आम्ही तुम्हाला तिन रुपये छापील किमंत असतांनाही जर मोफत वितरीत करतो. तर तुम्ही वर्षाकाठी नव्हे दरमहा वर्गणी देऊन आमचे कडून रितसर पावती घ्यायला नको का ? तसेच दुसरे म्हणजे बातमी देतांनाच निदान लघुपत्रकारांना (शासनाच्या जाहिराती मिळत नसल्यामुळे) तुमच्या सेवेचे फळ म्हणून छपाई खर्च द्यायला नको का ? याचा सुद्धा विचार करायला नको का ? अहो नाही मनाची तर जनाची .... तरी प्रत्येकाने थोडी ठेवावी व आमच्या सारखे तळहातावर प्राण घेऊन मैदानात उतरा म्हणजे कळेल . आमच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसे करतो आम्ही ? तेव्हा समझनेवालेको इशारा काफी समजून इथेच विराम घेतो . (पुन्हा भेटू कधी तरी टिप :हा लेख कोरोना काळात शहिद झालेल्या माझ्या सच्च्या समाजभक्त व देशभक्त कोरोना योद्धे पत्रकारांच्या पावन स्मृतिला समर्पित)
लेखक : संजय कडोळे, (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ) संपादक - साप्ता . करंजमहात्म्य कारंजा (लाड) जि वाशिम मो न9075635338
आपल्या प्रतिक्रिया द्या....