आश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जाणारा दसरा म्हणजे आयुध किंवा शस्त्र पूजा. माणसाच्या आणि समाजाच्या रक्तात शौर्य प्रकट व्हावं म्हणून दसरा सण साजरा केला जातो. विजयादशमी सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा करतात.
भगवान रामाने याच दिवशी रावणाचा वध केला होता. दसरा शुभ मुर्हूर्तापैकी एक आहे. या दिवशी शस्त्रपूजा तसेच वाहनांची पूजा करतात. प्राचीन काळात राजा या दिवशी विजयाची इच्छा करून आणि त्यासाठी देवाकडे प्रार्थना करून युद्ध यात्रेसाठी जात असे. दसरा हा सण दहा प्रकारचे पाप, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, आळस, हिंसा आणि चोरी यासारख्या अवगुणांना सोडण्यस प्रवृत्त करतं.
भारत हा एक कृषिप्रधान म्हणजे शेतकऱ्याचा देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पीकलेले धान्यरुपी धनाला आपल्या घरात घेऊन येतो, त्यावेळी उत्साहाला आणि आनंदाला पारावार नसतो. पावसाळा संपतो आणि नदीचा पूर शांत होतो. या दसरा सणाचा संबंध नवरात्राशी येतो. माँ दुर्गामातेने महिषासूराचा वध केला होता. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला विजयादशमी म्हणतात.
या काळात रामलिला आयोजित करतात. रावणाचा पुतळा पेटविला जातो. काही कलावंत राम-सीता आणि लक्ष्मणाचा वेष धारण करून येतात. आगीच्या बाणाने या पुतळ्यांना आग लावतात. हा सण वाईटावर चांगल्याची विजयाचा प्रतीक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत दसरा सणांबद्दल लिहितात. ते काय म्हणतात ते पाहू या आणि त्याच पध्दतीने दसरा सण साजरा करु या.
ऐसाचि आहे दशहरा दिन ।
विजयादशमी उत्साहपूर्ण ।
त्याने वाढे स्नेह संघटन ।
उत्तम गावी ।।
ते दिनी उत्तम संकल्प करावा ।
आपुले ते सर्वांचे हा बोध घ्यावा ।
मतभेद समूळचि विसरावा ।
सोने देवोनी एकमेंका ।।
असाच विजयादशमी किंवा दसरा सण उत्साहाने भरलेला असतो. गावात मित्रत्वाची वृत्ती वाढविण्यास या सणाचा उपयोग चांगला होऊ शकतो. दसरा या सणाचे दिवशी सर्वांनी मिरवणूकीने सीमोलंघन करावे. थोर पुरुषाचे पोवाडे गावे, पूर्वीच्या ऋषी मुनींच्या गोष्टी कौतुकाने सांगाव्या व राष्ट्रीय जयघोष करावा. या दिवशी उत्तम संकल्प करावे व आपल्याजवळ जे काही असेल ते सर्वांचे सुखासाठी आहे, ही जाणीव मनात जागृत करावी. एकमेकांस सोने देऊन आपसातील मतभेद व वैरभाव विसरून जावे. पुढे भांडणाचे मूळच ठेवू नये. सगळ्यांनी सगळ्यास नमस्कार करून बंधुभावाने परस्परांचे अभिष्टचिंतन करावे. मिरवीतच आपआपल्या घरी जावे. घरच्या देवांना व संतांच्या फोटोला वंदन करावे. आईवडिलांचे कौतुकाने आशिर्वाद घ्यावेत. या शुभ दिवशी नविन सेवेच्या कामाचा संकल्प करावा व तो वर्षभर कृतीत आणावा, असा सोहळा सर्वांनी दृढतेने करावा. असे राष्ट्रसंत आपल्या ग्रामगीतेतून लोकांना सांगतात.
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोनः 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....