आपल्या देशातील सर्वच नेते लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार आणि आमदार दर पाच वर्षांनी लोकशाही मार्गाने जनतेच्या मतदानातून सत्ता प्रस्थापित करून सत्ताधिश होत असतात.व एकदाची निवडणूक संपली की, "गरज सरो वैद्य मरो." ह्या त्यांच्याच ब्रिदवाक्या प्रमाणे ते मतदारांना बेईमान होऊन,केवळ स्वतःकरीता, स्वतःच्या कुटुंबीया करीता आणि स्वतःच्या राजकिय पक्षाकरीता जगत असतात.हा आजपर्यंतचा इतिहास आहे. "नेते असल्याचा त्यांचा अहंकार आणि स्वतःची तिजोरी भरण्याचा त्यांचा मोह" त्यांना समाजसेवक किंवा सामान्य कार्यकर्ता होऊन मतदारांचे,शेतकऱ्याचे,गोरगरीब नागरीकांच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचे,त्यांच्या उदरनिर्वाहा करीता रोजगाराचे,सुशिक्षीत बेरोजगाराचे,दुर्धर आजारग्रस्त आणि निराधाराचे,बेघरांचे, आपल्या मतदार संघातील जनसामान्यांचे प्रश्नच सोडवू देत नाही.हे महत्वाचे खरेखुरे कटूसत्य आणि वास्तव असते.त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पार पडल्या नंतर आजही श्रीमंत आणि सर्वसामान्य गरीब यांच्यामध्ये असलेली दरी ही कमी झाली नाही तर दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. प्रस्थापितांकडे कोणतीही जनशक्ती नसतांना सुद्धा त्यांची धनशक्ती वाढतच जाते आहे. "स्वतःचे राजकारण करण्यासाठी, पाच वर्षे मतदारांच्या डोळ्याने केव्हाच न दिसणारे नेते हे, निवडणूका आल्या म्हणजे त्यांच्या दलालांमार्फत मतदारांना साड्या,कापडं,शे दोनशे रुपये नगदी, त्यांच्या सभेला उपस्थिती म्हणून मतदारांची मुंडकी दिसावी शे-दोनशे रुपये मजूरी देऊन खेडोपाडीच्या गोरगरीब मतदारांना ओढून ताणून आणले जाते.खादाळ किंवा व्यसनींना मटण आणि दारू करीता पैसे देऊन ही धनाढ्य नेतेमंडळी लाचार मतदार व्यक्तींच्या मतांचा स्वत:च्या निवडणूक मतदानाकरीता परिपूर्ण वापर करून घेत असतात. व निवडणूक पार पडून विजय मिळवून घेतला की,मतदारांची पुढील पाच वर्ष पर्यंत सतत उपेक्षा आणि प्रतारणा करीत असतात. एकदा सत्ता मिळाली म्हणजे हे धनाढ्य नेते मतदार,समाज आणि देशाप्रती प्रामाणिक रहातच नाहीत. मतदाराला गरज पडली तर हे खासदार आमदार उपलब्ध होत नाहीत. या धनाढ्य सत्तेत असलेल्या नेत्याच्या सभोवती त्यांच्याच चार-पाच खाजगी निकटवर्तीयांचे जाळं असते. हे जाळं पार करून खासदार आमदार यांच्यापर्यंत गरजू सर्वसामान्य मतदाराला जाताच येत नाही.तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब मतदार असलेला शेतकरी, खेड्यापाड्यातील ग्रामस्थ यांची प्रत्यक्ष भेट हे खासदार आमदार हेतुपुरस्परपणे मुद्दाम टाळतात व गरीब मतदारांची क्षुल्लक कामे देखील करून देतच नाहीत. मतदाराच्या मतांवर निवडून आले की, यांना शासन (मतदाराच्या जीवावर) मोफत खासदार किंवा आमदार निवास,लाखो रुपयाचे मानधन,(पेन्शन)भत्ते,मोबाईल बिल, सेक्रेटरी,ड्रायव्हर, स्वयंपाकी इत्यादी सोयीसुविधा तसेच मतदार संघाच्या विकासाकरीता करोडो अब्जो रुपयांचा विकास निधी पुरवीते. मात्र ज्या मतदारामुळे त्यांना निवडून आल्यानंतर हे सोन्याचे दिवस अनुभवयाला मिळतात. त्या त्यांचेवर कोटी कोटी उपकार करणाऱ्या उपकारकर्त्या सर्वसामान्य मतदार नागरिकांना हे खासदार आमदार बेईमान होऊन स्वतः व्हीआयपी (प्रतिष्ठित) म्हणून मिरवीत असतात. नंतर यांचे व्हिआयपी बंगले,व्हिआयपी गाड्यापर्यंत कोणताही परिस्थितीने सुदामा असलेला सर्वसामान्य मतदार असलेला शेतकरी वा शेतमजूर, विद्यार्थी किंवा सुशिक्षित बेरोजगार पोहचू शकत नाही. आज दुदैवाने मला म्हणावे लागते हेच "आजच्या स्वतंत्र लोकशाहीचे वास्तव आहे." त्यामुळे मतदारांनी यापुढे खासदार आमदार यांच्या करीता होणाऱ्या निवडणूकी करीता डोळ्यात अंजन टाकून आपल्या नजरेने आजीवन तुमच्या आमच्या सर्वसामान्य मतदारा मध्ये जीवन जगणारा नेता निवडला पाहिजे.आज खरी लोकशाही निर्माण करण्याकरीता "धनशक्ती विरुद्ध जनशक्ती" एकत्र आली पाहीजे.यांच्या जेवणावळी, मटण किंवा दारूपार्ट्यांवर मतदारांनी बहिष्कार टाकला पाहिजे.यांच्या जाहिर सभा व बैठकीला थोडीसी चिरीमिरी म्हणजे शेदोनशे रुपये मजूरी घेऊन जाणे टाळले पाहिजे.यांचा एखादा दलाल तुम्हाला पैशाचे आमिष देत असेल तर त्याची रिकॉर्डींग करून,फोटो व्हिडीओ काढून, त्याची तक्रार निवडणूक अधिकारी,जिल्हाधिकारी,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग किंवा पोलीस प्रशासनाकडे करून अशा धनाढ्य नेत्यांचे पितळ उघडे पाडले पाहिजे.तसेच मतदाराच्या मताद्वारे लोकशाही मार्गाने निवडून येणाऱ्या खासदार आमदार यांनी आपल्या मतदाराचे आजन्म ऋणी राहून, त्यांच्या उपकाराची सदैव जाण ठेवून, मतदार आणि मतदार संघ यांच्या विकासासाठी वचनबद्ध राहीले पाहिजे.मतदाराच्या सुखदुःखात सदैव सहभागी असलं पाहिजे.ज्यादिवशी स्वतः श्रीकृष्ण होऊन सुदाम्याला ओळखणारे सच्चे खासदार आमदार पदारूढ होतील त्यादिवशी खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघात प्रजासत्ताक लोकशाही स्थापन होईल. म्हणजेच " लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणारे व्हिआयपी नेते,ज्या दिवशी सामान्य कार्यकर्ते होऊन नागरिकांचे प्रश्न म्हणजे समस्या सोडवतील त्या दिवशी देशात स्वराज्य आणि सुराज्य निर्माण होईल.
लेखक : संजय कडोळे, (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) अध्यक्ष विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड) जि. वाशिम. मो.9075635338.
आपल्या प्रतिक्रिया द्या....