कारंजा [लाड] : सध्याच्या काळात चोर आणि दरोडेखोर नवनव्या शक्कल लढवून, भर चौकात, दिवसाढवळ्या डोळ्यात अंजन घालून लुट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार करीत असल्याचे कारंजा शहरात दिसून आले असून, याबाबत सविस्तर असे की, १५ सप्टेंबर रोजी, सव्वा अकराचे दरम्यान,माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया यांच्या अर्ध्यांगीनी, सौ दिनादेवी अरविंद लाठीया वय ६५ वर्ष ह्या टिळक चौकातून वर्दळीच्या रस्त्याने, ब्रिजमोहन मालपाणीजी यांच्या घरासमोरुन जात असतांना, तोतया पोलिस बनून आलेल्या व्यक्तिने, अक्षरशः संमोहित करून,सौ दिनादेवी लाठीया या वयोवृद्ध महिलेला, आपणही गुजराती असल्याचे भासवून, अंगावरील दागीने काढण्यास सांगून सुरक्षित ठेवण्यास सांगीतले . त्यांचे गळ्यातील २५ ग्रॅमचे मंगळसूत्र, ३ ग्रॅम व २ ग्रॅमच्या अंगठ्या जवळचा कागद देवून पुडीत बांधून त्यांच्याच पिशवीत ठेवल्यात व मंदिरात जाण्यास भाग पाडले . मंदिरात त्यांनी पुडी उघडून बघीतली असता त्या पुडीमध्ये दगडाचे खडे असल्याचे त्यांना आढळून आल्याने, त्यांनी अज्ञात अनोळखी तोतया पोलीसांनी , एक लाख रुपयाचे दागीन्यांनी फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनला दाखल केली असून, अप क्र ४७१ / २०२२ कलम १७०, ४२० भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात येवून शहर पो स्टेचे पोलिस निरिक्षक आधार सिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोउपनि दिनकर राठोड हे करीत आहेत. या घटनेवरून, तोतया पोलिसांचे रुपात चोरी व दरोडे टाकणाऱ्या आणि महत्वाचे म्हणजे महिला मंडळीना संमोहीत करून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात की काय ? असा प्रश्न निर्माण झाला असून, " सध्या सणासुदीचे, नवरात्रोत्सव, यात्रा महोत्सवाचे दिवसात महिला मंडळीनी अंगावर सोन्या चांदीचे दागदागीने घालून जावू नये . आपले मोबाईल व पर्स सांभाळावेत . अनोळखी व्यक्तिशी बोलणे टाळावे . आपणास एखादी अनोळखी व्यक्ती संमोहित करून त्याचे ऐकण्यास भाग पाडू शकते या बाबत सतर्क रहावे . तसेच गाडी, मोबाईल व दागीने यांची काळजी घ्यावी . " असे आवाहन कारंजा शहर पोस्टे कडून करण्यात आले असल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .