वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) भारताच्या पाकिस्तान आणि चीन सीमेवरील लेहच्या सियाचीन भागात कर्तव्य बजावत असताना मालेगाव तालुक्यातील शिरपूर (जैन) येथील सुपुत्र व भारतीय सैन्यातील ५ महार रेजिमेंटचा नायक आकाश काकाराव अढागळे (वय ३२ वर्षे ) यांना १० सप्टेंबरच्या रात्री वीरमरण आले. आकाश हे सियाचीन भागात १० सप्टेंबर रोजी रात्री कर्तव्यावर असतांना त्यांच्या राहण्याची व्यवस्था असलेल्या बॅरेकच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून पडल्याने गंभीर जखमी झाले.उपचारादरम्यान त्यांना वीरगती प्राप्त झाली. शहीद आकाशचे पार्थिव १२ सप्टेंबर रोजी रात्री भारतीय सेनेच्या विमानाने नागपूर येथे पोहोचणार आहे.१३ सप्टेंबरला समृद्धी महामार्गाने शिरपूर(जैन) पोहल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहीद आकाशवर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्युने वाशीम जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली असून, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद वाशिम,साप्ताहिक करंज महात्म्य परिवारातर्फे त्यांना शब्दसुमनाने श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.