गडचिरोली,(जिमाका)दि.22:-
केन्द्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संपूर्ण भारत देशात दिनांक २१ ते २७ मार्च २०२२ या कालावधीत "स्वस्थ बालक बालिका स्पर्धा " या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश A nation wide Movement to promote the value of Nutrition असा असून या अभियानांतर्गत जिल्हयातील ग्रामीण / आदिवासी तसेच नागरी क्षेत्रातील ० ते ६ वर्षे वयोगटातील सर्व बालक / बालिकांचे अभियान कालावधीत वजन, उंची घेऊन त्याची नोंद केन्द्र शासनाने तयार केलेल्या अप्लिकेशनमध्ये भरावयाची आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यक्षेत्रातील बालकांचे वजन, उंची घेऊन अंगणवाडी सेविका नोंदी घेणार आहे. तसेच या योजना परिक्षेत्राबाहेरील बालकांचे वजन, उंची घेऊन नोंद करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्राम विकास, नगरविकास, आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत तसेच लायन्स क्लब, रोटरी क्लब, स्वयंसेवी संस्था, इंडियन मेडीकल असोसिएशन, स्थानिक कल्याणकारी संस्था, बालरोग तज्ञांची संघटना, कामगार संघटना, शालेय शिक्षक, तरुण मंडळे, महिला संस्था व महिला बचत गट यांनी या अभियानमध्ये सहभागी व्हावयाचे आहे.
"स्वस्थ बालक बालिका स्पर्धा " या अभियानाचे नियोजन व अंमलबजावणी करण्याकरिता तालुकास्तरावर तहसिलदार व नागरी क्षेत्रात संबंधित शहराचे नगरपालिका/नगरपंचायत मुखयाधिकारी हे नोडल ऑफिसर आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजने बाहेरील बालकांचे वजन, उंची घेण्याकरिता अभियान कालावधीमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरिता शालेय इमारती, ग्राम पंचायत, समाज मंदीर, मंदिर इत्यादी जागा उपलब्ध करुन देण्यात यावे. बालकांचे वजन व उंची मोजण्याकरिता वजनकाटा, उंचीमापक इत्यादीची मोठया प्रमाणावर आवश्यकता भासणार आहे. याकरिता नजीकच्या शासकीय, निमशासकीय, खाजगी रुग्णालये, खाजगी दवाखाने, लायन्स क्लब, रोटरी क्लब, स्वयंसेवी संस्था, इंडियन मेडीकल असोसिएशन इत्यादींनी वजनकाटा व उंचीमापक यंत्र उपलब्ध करुन द्यावे. तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन, उंची मोजण्याच्या शिबिरामध्ये प्रत्येक बालकांचे वजन, उंची मोजून घेण्याकरिता " माझे मुल माझी जबाबदारी " या घोषवाक्यांप्रमाणे जिल्हयातील पालकांना विशेष आवाहन करण्यात येत आहे. तसेच या अभियानाचा लाभ प्रत्येक बालकाला होईल याकरिता पालकांनी, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब, इंडियन मेडीकल असोसिएशन, स्थानिक कल्याणकारी संस्था, बालरोग तज्ञांची संघटना, कामगार संघटना, शालेय शिक्षक, तरुण मंडळे, महिला संस्था व महिला बचत गट यांनी उत्सपूर्तपणे सहभागी होऊन सदर अभियान यशस्वीरित्या होण्यास सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....