अकोला:- विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या धनी डॉ. जया द्वादशीवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाच चित्रकर्मींचा सन्मान करण्यात येत आहे. यामध्ये गजानन घोंगडे यांच्या बरोबरच सौ. सुश्रुत चेतन,श्री. सुदर्शन बारा पात्रे, श्री. शैलेश मेश्राम व श्री. विवेक रानडे यांना प्रत्येकी एक लक्ष रुपये, मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे.
गजानन घोंगडे यांना यापूर्वी 2014 साली भारत सरकारच्या माहीती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या 15 ऑगस्ट 2014 च्या जाहिरात आरेखन स्पर्धेत देशभरातून आलेल्या 16,000 प्रवेशिकांमधून त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळालेले आहे.
व्यंगचित्र कलेच्या क्षेत्रात मानाचा समजला "इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट, बेंगलोर" च्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरचा "माया कामत स्मृती राजकीय व्यंगचित्रकारिता" पुरस्कार 2011 व 2014 अशा दोन वर्षी त्यांना प्राप्त झाला आहे. दोन्ही वर्षी समीक्षक श्रेणी अंतर्गत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर याच संस्थेने घेतलेल्या आंतराष्ट्रीय अर्कचित्र प्रदर्शनात अनेकवेळा त्यांची चित्रे प्रकाशित झाली आहेत. 2014 साली जर्मन वकिलातीतर्फे दिल्ली येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र स्पर्धा व प्रदर्शनात जगभरातील 20 हून अधिक देशांचा समावेश असलेल्या व्यंगचित्रकारांमधून निवडण्यात आलेल्या 20 व्यंगचित्रांमध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचा समावेश झाला होता. 2015 मध्ये त्यांच्या व्यंगचित्र क्षेत्रातील योगदानाकरिता पुण्यातील आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा मानाचा "आचार्य अत्रे पुरस्कारा" नेही त्यांना गौरविण्यात आले आहे.
2017 साली त्यांच्या कलाक्षेत्रातील चौफेर मुशाफिरीबद्दल अशोकपुष्प प्रतिष्ठान मुंबई यांनी त्यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. २०२१ साली पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लोगो साठी त्यांनी केलेल्या लोगोची निवड झाली यापुढे त्यांनी तयार केलेला लोगो हा पेंच प्रकल्पाची नवी ओळख राहणार आहे. २०२२ व २०२३ साली दिल्लीच्या अन फोल्ड ड्रीम्स या कंपनीने घेतलेल्या व्यंगचित्र स्पर्धेत त्यांच्या व्यंगचित्राला अनुक्रमे तिसरा व चौथा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे.