कारंजा : वर्षानुवर्षे एकमेकांपासून दूर गेलेले सहपाठी,शाळेचे आवार, वर्गखोल्यांचे आठवणींचे वादळ आणि आपल्याला घडवणाऱ्या गुरूजनांचा सन्मान,हे सारे एकत्र अनुभवण्याचा अविस्मरणीय क्षण जे डी चवरे विद्यामंदिर, कारंजा लाड येथे १९८४-८५ च्या इ. १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ४० वर्षांनंतर अक्षय संगम सोहळ्याच्या निमित्ताने ११ मे २०२५ रोजी अनुभवला.शाळेच्या प्रांगणात अतिशय हर्षोल्हासात ८५ पैकी जवळपास ५५ विद्यार्थ्यांनी, सहपरिवार या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.
सोहळा उत्कृष्ट अल्पोपहारानंतर सुरू झाला.या कार्यक्रमासाठी शाळेचे सध्याचे संचालक मंडळाचे प्रमोद सावजी चवरे, व संचालक तथा शाळेचे त्या वर्षाच्या बॅचचे शिक्षक वृंद सूर्यप्रकाश इंगळे सर , संतोष मिस्त्री कोटकर सर ,अविनाश मुधोळकर सर ,भगवंतराव शिंदे सर , मोहन नवरे सर अजाबराव आंधळे सर तसेच सौ.कारंजेकर मॅडम,सौ विजया नांदगावकर मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी काशीराम पवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिली. सोहळ्याचे अध्यक्षपद सध्याचे मुख्याध्यापक श्रीनिवास राघवेंद्र जोशी सरांनी भूषविले.
मान्यवरांच्या हस्ते सुमधुर संगीतमय वातावरणात सरस्वती पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रारंभ जग सोडून गेलेल्या दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली देऊन त्यांचे स्मरण करण्यात आले. सर्व मान्यवरांचा विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी कॅप्टन अतुल एकघरे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रास्ताविक करत सर्वांचे स्वागत केले.
त्यानंतर "अक्षय संगम" या स्मरणिकेचे विमोचन शाळेचे संचालक माननीय प्रमोद सावजी चवरे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, सोबतच उपस्थितांमध्ये वितरण सुद्धा करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहपरिवार सन्मान करण्यात आला. यावेळी प्रत्येक माजी विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले.
शाळेतील जुन्या आठवणी जागवताना सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत आयुष्यातील प्रवास कथन केला. यापैकी आज कोणी आजी- आजोबा झाले, तर कोणी शिक्षक तर कोणी व्यावसायीक, सेवा,कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.या साऱ्यांचा परिचय एकमेकांतील जुनी नाती अधिक बळकट करणारा ठरला. अनेकांच्या डोळ्यांत भावना तरळल्या.सर्वांनी आपल्या शालेय आठवणी शेअर करत मोकळेपणाने संवाद साधला. नंतर मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले .त्यात सौ चवरे ताईंनी शाळेच्या वतीने शब्दसुमनांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत ही शाळा सदैव तुमचीच आहे. व असे सोहळे आपण दरवर्षी घ्या.व जीवनातील काही क्षण आमच्या सोबत आनंदी घालवा .असे मनोगत व्यक्त केले व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर अध्यक्षीय भाषणाचे वेळी मुख्याध्यापक जोशी सरांनी अगदी समर्पक व मार्मिक संवाद साधला. जोशी सरांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत, “विद्यार्थी हीच आमची खरी संपत्ती आहे. त्यांच्या प्रगतीनेच आमच्या श्रमांना फळ मिळते,” असे सांगत सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुलांच्या आजच्या भावना बघून बालपण किती गोड असतं .व शालेय गमतीजमती किती स्मरणीय असतात व आपण सर्वांनी नेहमीच लहान बनून जगण्याचा अनुभव घेत राहिलं पाहिजे .तर जीवनात नेहमीच आनंद राहील असे वक्तव्य केले.
त्यानंतर सर्व उपस्थितांनी सुरुची भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला.भोजनामधील पुरणपोळी व आमरसाने तर जेवणात रंगत आणली,सोबतच कुरडई, पापडी, सार, भात, भजे, दोन प्रकारची लोणचे.... मग काय ...मुलींना तर माहेरी रसाळीसाठी आल्याचाच अनुभव आला. यथेच्छ भोजनासोबत मुला-मुलींच्या परत एकदा ओळखी, गप्पा, जुने किस्से, मस्ती सुरू झाली. लगेचच अविनाश मुधोळकर सर व आंधळे सरांनी मुलांचा वर्ग घेतला व त्या वर्गात मुलांनी सुद्धा चाळीस वर्षे मागे गेल्याचा व लहान झाल्याचा आनंद घेतला.
त्यानंतर विद्यार्थ्यांमधील कलाकारांनी अंगी असलेल्या कलागुणांची मान्यवर तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर मैफिल मांडली. मन मोकळेपणाने आज ५५- ६० च्या वयात असलेले विसरून अगदी लहान होऊन खूप मजा मस्ती नाच गाणे करीत कार्यक्रमाच्या समारोप केला. कार्यक्रम संपला तरी कुणाचेही पाय प्रांगणातून निघण्यास तयार नव्हते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गहाणकरी सरांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व बारकाईने पार पाडले. तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी विजय ताथोड यांनी केले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण शाळेचा परिसर संचालकांनी विद्यार्थ्यांसाठी मोकळा करून दिला होता. या कार्यक्रमासाठी कारंजा येथे स्थायिक असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीं त्यात प्रामुख्याने प्रदीप अर्धापुरकर बुलडाणा सुशील मुधोळकर, हितेंद्र गंधक, अमोल बांडे, नितीन महाजन व राजू राठोड यांनी अथक परिश्रम घेतले म्हणून हा अविस्मरणीय अक्षय संगम सोहळा अतिशय आनंदात पार पडला. मुंबई, पुणे, उल्हासनगर, आदिलाबाद, उज्जैन, नागपूर व इतर दूरच्या ठिकाणांहून आलेले माजी विद्यार्थी कार्यक्रम संपल्यावर मात्र डोळ्यांत पाणी आणि हृदयात आठवणींचा भार घेऊन जड अंतःकरणाने परत गेले.
या गेट टु गेदरने केवळ आठवणी जागवल्या नाहीत, तर मैत्रीला नव्याने अर्थ दिला आणि आयुष्याच्या पुढील प्रवासाला नवी प्रेरणा दिली.असे वृत्त कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात साकार करणारे जे.डी.चवरे विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी प्रदिप अर्धापूरकर यांनी कळवीले .
दोस्तो के साथ जी लेने का
मोका दे दे ऐ खुदा
तेरे साथ तो मरने के बाद भी
रह लेंगे
आपल्या प्रतिक्रिया द्या....