स्व. श्रिनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदा राष्ट्रपती पूरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा "ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग"या विषयावरील जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न
वरोरा :
आमदार-खासदाराच्या भरोशावर अजिबात राहू नका, गावाचा विकास आपल्याच हाती आहे. देशाला महासत्ता करायच असेल तर आधी गावे शक्तिशाली व स्वयंपुर्ण झाली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती पूरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी येथे केले.
स्व. श्रिनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदा राष्ट्रपती पूरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा "ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग" या विषयावरील जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम (दि. २३ मार्च) रोज बुधवारला स्थानिक बावणे मंगल कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, सीडीसीसी बँकेचे संचालक डॉ. विजयराव देवतळे, जेष्ठ साहित्यिक व विचारवंत व कार्यक्रमाचे उदघाटक ना. गो. थुटे, जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी अर्थ व नियोजन तथा बांधकाम सभापती प्रकाश मुथा, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक रमेश राजूरकर, धनोजे कुणबी समाज जिल्हाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते, शिवसेना विस्तारक महाराष्ट्र (चंद्रपूर लोकसभा) चे नित्यनंद त्रिपाठी, अॅड. शरद कारेकार, नंदकिशोर वाढई, पंचायत समिती वरोराचे माजी उपसभापती दत्ता बोरेकर, जयंत टेमुर्डे, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, शिवसेना तालुकाध्यक्ष भास्कर ताजणे, युवासेना शहर प्रमुख भद्रावतीचे उमेश काकडे, माजी शिवसेना तालुका संघटक ब्रम्हपुरीचे रीन्कू पठाण, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, , शिवसेना विभाग प्रमुख गोपाल बोढे, सामाजिक कार्यकर्ते करण देवतळे, जिल्हा समुपदेशक महिला सल्लगार सदस्य चंद्रपूर योगिता लांडगे आणि या कार्यक्रमाचे आयोजक रविंद्र शिंदे मंचावर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी मंचावर स्थानापन्न होण्यापूर्वी मंचासमोरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, भारत मातेचे सुपूत्र शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमांना मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली.
व्याख्यानकर्ते आदर्श सरपंच यांच्या व्याख्यानाचा आनंद घेण्यासाठी सभागृह खचाखच भरलेले होते.
भास्करराव पेरे पाटील पुढे म्हणाले की मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराष्ट्रातील सर्व ग्रामिण भागातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये कशाप्रकारे चांगल्यात चांगल काम करता येईल यासाठी आदर्श ग्रामपंचायती घडवा. गावागावात नागरीकांकरीता स्वच्छ पाणी, वृक्षलागवड, स्वच्छता, शिक्षण, या मुलभुत गरजा आधी पुर्ण करा व गावातील सर्व वृद्धांचा सांभाळ गावाने मिळुन करावा. पूर्वी माणसाच आयुष्य १०० वर्षे होतं आता ते ५० ते ६० वर आलय याचा विचार गंभिरतेन व्हायला पाहिजे.
देशाला महासत्ता करायच असेल तर या पाच गोष्टी करा.
आपल्या पोटात रोज ४ लीटर पाणी जातं. हे पाणी स्वच्छच असल पाहिजे. आज ९० टक्के गावात पिण्याच पाणी दुषीत आहे हि लाजिरवाणी गोष्ट आहे. गावात भरपूर झाडं लावा. केवळ रामराम केल्याने व भजन केल्याने पाऊस पडत नाही. चांगल्या शेतीसाठी व मुलांच्या आरोग्यासाठी गावात भरपूर फळांची झाडं लावल्या गेली पाहिजेत व गावातिल मुलांना ती खाऊ दिली पाहिजेत. मुलं जर निरोगी राहिलेत तरच ख-या अर्थान गावाचा विकास संभव आहे. सरपंचाने ईस्त्रीचे कडक कपडे घालण्यापेक्षा लोकांमध्ये मिसळून लोकांसोबत लोकांना समजेल अशा भाषेत संवाद साधला पाहिजे तेव्हाच लोकं ऐकतील . सरपंच जर लोकांमध्ये मिसळलाच नाही तर गावाचा विकास शक्य नाही . गावातील स्वच्छतेच्या कामात स्वतः सरपंचाने प्रत्यक्ष सहभागी व्हायला पाहिजे. गावात गटार व्यवस्था व शौचालय चांगल्या स्थितीत आहेत, याकडे पुढा-याचं लक्ष असलं पाहिजे. गावातील शाळेकडे व मुलांच्या चांगल्या शिक्षणाकडे गावाचे जाणिवपूर्वक लक्ष असायलाच पाहिजे. गावक-यांना कलेक्टरचा बाप होता आलं पाहिजे म्हणजे आपल्या गावातून शिक्षणात स्पर्धेत उतरता येणारे विद्यार्थी निपजले पाहिजेत. माझ्यागावात चार प्रकारचे पाणी ग्रामपंचायती कडून लोकांना पूरविल्या जाते. माझ्या गावातिल १४१ लोकांनी पुढच्या वषी टॅक्स भरलेला आहे. १ एप्रिलपर्यंत १०० टक्के टॅक्स वसुली होत असते. लोक पैसे का देतात कारण लोकांना रोज २० लीटर आरोच पाणी, साध पाणी, गरम पाणी, नदीवरुन आणलेलं पाणी आणि आता याव्यतिरीक्त जे पाणी अमिताभ बच्चन, शाहरुख खान पितात, अस शुद्ध पाचव्या प्रकारच पाणी गावक-यांना द्यायच लक्ष आहे. गावात पिठाची गिरणी, आलु चिप्स मशिन, मसाले करुन देणे, उसाचा रस काढून देणे ही सर्व कामं ग्रामपंचायती कडून विनामुल्य केली जातात. लेकराला कसं सांभाळायच हे आईला शिकवावं लागत नाही त्यामुळे सरकारचा जीआर काय सांगतो याकडे लक्ष देण्याची गरज नाही. गावात प्लॅस्टीकचा कचरा होवू नये यासाठी १५ रुपये किलोने ग्रामपंचायत खरेदी करते. गावात ग्रामपंचायतीने स्वतःचा ट्रॅक्टर घेतला आणि लोकांच नांगरण वखरण अध्र्या किमतीत करुन दिल्या जाते . आत्तापर्यंत दिड कोटींचे पुरस्कार मिळाले आहेत.
गावात गावातील सर्व महीलांना सॅनिटरी नॅपकीन फ्री, दिवाळीला २५ किलो साखर फ्री, गावात म्हाता-यांसाठी फ्रि मशिन मसाज, पुढा-यांना एवढी जरी अक्कल आली तरी गावाचा विकास निश्चितच होवू शकतो. ३८ गावातील वृद्धांचा सांभाळ ग्रामपंचायत करते. लग्नाचा वाढदिवस, वाढदिवस, मुलांचा वाढदिवस यासाठी गावकरी ग्रामपंचायतीला २ ह्जार रुपयांची मदत करतात. ग्रामसेवक सगळेच त्रास देतात. ग्रामसेवक, बीडीओ, सीओला घाबरत नाही तो निवडणुकीत पडलेल्यांना घाबरतो. त्याच्यावर गावक-यांनी जिव लावणं गरजेच आहे हे सांगतांनाच ग्रामसेवकांनी सुद्धा गावावर तेवढाच जीव लागण्याची गरज आहे हे आवर्जून सांगितलं. महात्मा गांधीनी गावाकडं चला यासाठीच म्हंटल असावं कदाचित. लग्नाची नोंद केली नाही तर पोराच्या जन्माची नोंद कशी घ्यायची ? शेजा-याला नव-याला बायकोला, ग्रामसेवकाला समजुन घेतल्याशिवाय गावाचा विकास शक्य नाही. जोडीदाराला घेवून चालता आल पाहिजे. या जगात तुमच्याजवळ किती पैसा आहे याला काहीच अर्थ नाही तुम्हि त्याचा उपयोग कसा करता तुम्ही किती लोकांना सोबत घेवून चालता यालाच खरा अर्थ आहे.
अध्यक्षीय स्थानावरुन बोलतांना आवर्जून पेरे पाटलांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींच पालन गावांनी केलं तर निश्चितच गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच कार्य निश्चितच अभिनंदनिय आहे, ते अविरत सुरु रहावं अस ते म्हणाले. रवी शिंदेसारख व्यक्तिमत्व हे आज आपल्या क्षेत्राची गरज आहे. असा धडाडीचा कार्यकर्ता होणे नाही. लोकांनी रवी सारख्या खंबीर नेतृत्वाला साथ देण्याची गरज आहे. या लोकशाहीत जनता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांना सोबत घेवून चालणा-या नेत्याची गरज आहे आणि असा नेता कसा असावा हे तुम्हाला रविंद्रकडे पाहिल्यावर लक्षात येईलच. शिंदेंची दातृत्व शक्ती निश्चितच मोठी आहे. बदलत्या काळात सगळ्यांना समजून घेवून समोर जाता आल तर निश्चितच गावाचा विकासा साधता येईल, असे पेरे म्हणाले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक टिपले यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....