वाशिम:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खासगी कंपनीच्या माध्यमातून नियमबाहय पध्दतीने कर्मचारी भरती करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख डॉ. विशाल सोमटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली असल्याचे त्यांनी स्वतः महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांना सांगीतले आहे.
या संदर्भातील त्यांच्या तक्रारी व निवेदनानुसार, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनी मार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम येथे १८० कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रीया राबविण्यात आली.मात्र, सदर भरती करताना अधिक वितरीत होणाऱ्या वृत्तपत्रातून कोणत्याही प्रकारची जाहिरात देण्यात आलेली नाही,या भरतीदरम्यान कोणतेही शैक्षणिक निकष पाळण्यात आलेले नाहीत.तसेच या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे या गंभीर बाबीची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करावी .व स्थानिक वृत्तपत्रात नव्याने जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात यावे,तसेच गुणानुक्रमे पदनिहाय भरती प्रक्रीया पारदर्शकपणे राबविण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रती वैद्यकीय शिक्षण् मंत्री हसन मुश्रीफ,आ.भावनाताई गवळी, शासकीय वैद्यकीय महाविदयालय वाशीम अधीष्ठाता यांना पाठविण्यात आल्या आहेत.