कुणी कोणाचे नाही किंवा कोणी कोणाचे नसते. कुणीही कोणाच्याही दुःखात किंवा अडचणीत कायम सोबत नसतो. सगळेच नाते आपले नसतात पण काही नातेवाईक फक्त रक्ताच्या किंवा सामाजिक नात्यामुळे जोडलेली असतात. "तूने जो कमाया है, कोई दुसराही खायेगा । खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा ।" मृत्यू हा कधीही येऊ शकतो. त्यामुळे भगवंताचे स्मरण करुन जीवन सार्थ करावे. जेवढी कमाई केली ती एक दिवस येथेच राहील.
दुनिया में हमारा कोई नही ।
सब साथ है प्यारे मतलब के ।।धृ।।
या जगात कुणीही कायमचे कोणाचे नसते. सगळे शेवटी एकटेच असतात. जगातील सर्व नातेसंबंध, मित्र हे तात्पुरते असतात. "नाही रे नाही कुणाचे कोणी । अंती जाईल एकटाच, माझे माझे म्हणूनी । माझे नाही रे कोणी ।" माणूस जन्माला येतो तेव्हा एकटा असतो आणि मृत्यू झाल्यावर ही एकटाच असतो. माझे आणि आपले म्हणून ज्या गोष्टीचा आपण अभिमान बाळगतो त्या सर्व गोष्टी येथेच मागे राहतात. मतलब म्हणजे उद्देश, फायदा व आपला स्वार्थ साधण्यासाठी सर्वजण साथ देत असतात.
जब पास हमारे पैसा था ।
तब हमारे लाखो थे ।
जब पास का पैसा निकल गया ।
तब पास हमारे कोई नही ।।१।।
जेव्हा पैसा मुबलक होता तेव्हा नातेगोते, सोयरे, मित्र यांची कमी नव्हती. धनसंपत्ती जेथे असेल तेथे लोक संबंध जोडतात. जवळ असलेला पैसा संपला म्हणून लोक आमल्याकडे ढुंकूणही लक्ष देत नाही, पाहत सुद्धा नाही. पैसा आणि मैत्री यांच्यातील संबंध गुंतागुंतीचे असू शकतात. पैसा नाही तर तुमच्या मदती करिता कुणी धावून येत नाही.
मेहनत की कमाई लाखो की ।
एक महल बनाया खुद के लिये ।
वाह रहनेवाला मर भी गया ।
अब रोनेवाला कोई नही ।।२।।
कष्टाने मिळविलेला पैसा लाखोने होता म्हणून एक सुंदर भव्य घर स्वतः करिता बनविले. कष्टाची कमाई असेल तर काहीही करता येते. या घरात राहणाराच मरण पावला तर त्या व्यक्ती करिता रडणारे किंवा शोक करणारे कुणीही नाही. "जिंदगी एक किराये का घर है । एक न एक दिन बदलना पडेगा । मौत जब तुझको आवाज देगी । घर से बाहर निकलना पडेगा ।।" हा देह आपणांस परमेश्वराने भाड्याने दिला आहे. एक दिवस ते सोडून जावे लागेल. जन्मापासून मृत्यूपर्यंतची यात्रा आपणास एकट्यालाच करावी लागते. आपल्याला साथ करणारे परिवार, मित्र, नातेगोते कुणीच राहणार नाही.
कहे दास तुकड्या सुनो मेरे भाई ।
हरिनाम साथ तो जायेगा ।
धोखे में किसीके रहना नही ।
यहाँ कोई किसीका नही ।।३।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मी सांगतो ते ऐक. धनदौलत, नातेगोते, घरदार, बायकोमुले आपल्या सोबत येणार नाही. फक्त तुझ्या सोबत तू केले कर्म आणि परमेश्वराचे नामच जाईल. मृत्यूच्या भयावर मात करण्यासाठी आणि आपले जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी नेहमी भगवंताचे नामस्मरण करत राहावे. यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते आणि मृत्यूच्या कठीण प्रसंगात सामोरे जाण्याची शक्ती मिळते. भगवंताचे नाम पुढील प्रवासासाठी मोक्षाकडे घेऊन जाते. "घे घे घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे । हात लावूनी नशिबाला, रडशिल धाईधाई । या संसारा पायी, या संसारा पायी ।।" भोळेपणाने कधीही राहू धको कारण लोक तुम्हाला कधी धोका देईल याचा भरवसा नाही. जिथं तुम्हाला किंमत नाही तिथं तुम्ही जाऊ नका. कुणी कोणाचे नाही हे लक्षात ठेवा.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....