आपला भारत देश शेतीप्रधान असल्यामुळे शेतीच्या कामांसाठी बैलजोडीचा वापर केला जातो. आजच्या आधुनिक काळात टँक्टर व अन्य यंत्र सामुग्रीमुळे बैलांना शेतीचे कामी कमी वापरण्यात येतांना दिसून येते. शेतकऱ्यांचा सर्जाराज्या म्हणजे बैलाचे महत्त्वाचे स्थान आहे. बैलांच्या या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस भारतात पोळा सण म्हणून साजरा केला जातो.
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलाचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकण्याची पध्दती आहे आणि गोवरी पेटवून खांदे शेकले जाते. "आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या" या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते.
वाटी रे वाटी, खोबऱ्याची वाटी
महादेव रडे दोन पैशासाठी
पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी
देव कवा धावला गरिबासाठी
एक नमन गौरा पार्वती
हर बोला हर हर महादेव !
पोळ्याचा आनंद शेतकऱ्यांसाठी सुखदायक असतो. या सणांचे आता रुप बदलत चालले आहे. पोळ्याचे दिवशी बैल सजवून, शिंगे रंगवून, अंगावर झुल घालून आंब्याच्या तोरणाखाली उभी केली जातात. बैल तोरणाखाली आणल्यावर एकशे एक झडत्या म्हटल्या जातात. ह्या झडत्या म्हणजे लोक संस्कृती आहे. आपण काही निवडक झडत्या पाहू या.
गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा
वरच्या राणातून आणली माती
ते देली गुरुच्या हाती
गुरुनं घडविला महानंदी
तो नेला पोळ्यामंदी
एक नमन कवळा पार्बती
हर बोला हर हर महादेव !
गांवातील सर्वच बैल तोरणाखाली आल्यानंतर गावातील मान्यवर व्यक्ती, पाटील किंवा सरपंच यांचा मानाचा बैल येईपर्यंत पोळा फुटत नाही. त्या बैलाला वाजत गाजत आणले जाते. ग्रामीण भागात पोळ्याचे दिवशी झडत्यांची लोक संस्कृती असली सर्व सामान्य शेतकऱ्यांची परिस्थिती झडत्यातून विशद होते. पोळ्याच्या अक्षदा डोक्याला लावून आनंद व्यक्त करतात.
बळी रे बळी लिंब बनी
अशी कथा सांगेल कोणी
राम-लक्ष्मण गेले हो वनी
राम-लक्ष्मणाने आणली वनफुले
ते महादेव पारबतीच्या हाती
तिनशे साठ नंदी
एक नमन कवळा पारबती
हरहर बोला, हर हर महादेव !
अशाप्रकारे खेड्यातील लोक झडत्याची खैरात करतात. काही झडत्यातून विनोद सुद्धा केला जातो.
मेंढी रे मेंढी, शेंबडी मेंढी
ते खाते आला-पाला
तिचा गुरु माह्या चेला
लाथ मारुन सरका केला
एक नमन कवळा पारबती
हर बोला, हर हर महादेव !
आम्ही करतो पऱ्हाटीची शेती
पऱ्हाटीवर पडली बोंड अळी
नागोबुडा म्हणते बुडाली शेती
पोरगा म्हणते लाव मातीले छाती
एक नमन गौरा पार्बती
हर बोला, हर हर महादेव !
अशा ग्रामीण झडत्या शहरात ऐकायला मिळत नाही. ह्या झडत्या ऐकण्याकरिता खेडेगांवात जावे लागते. काही झडत्यातून शेतकऱ्यांची परिस्थिती दर्शविल्या जातात. पोळ्याचे निमित्त ही झडत्या गीताची परंपरा ग्रामीण भागातच जपली जाते.
आभाळ गडगडे
शिंग फडफडे
शिंगात पडले खडे
तुझी माय काढे
तेलातले वडे
तुझा बाप खाये पेढे
एक नमन गौरा पार्बती
हर बोला, हर हर महादेव !
लेखक:-पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....