अकोला:- महाराष्ट्रातील विधान सभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली ध्येय धोरणे, तत्व, पक्षनिष्ठा खुंटीला टांगून ठेवल्या आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचा इतिहास आणि वर्तमान यात जमीन अस्मानाची तफावत आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षांची ग्रेट इंडियन सर्कस सुरु आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.
राजकारणात साधारणतः समविचारी लोक, समविचारी पक्ष एकत्र येत असतात. सत्ता असो अथवा नसो परंतु ते पक्ष आपली ध्येय धोरणे कधीही सोडत नाहीत. भाजप-शिवसेनेची राज्यात अनेक वर्षापासूनची युती होती. सुरुवातीला त्यांच्याकडे सत्ताही नव्हती. तरीही ते एकत्रच होते. काँग्रेस-राष्ट्रवादीही ध्येय धोरणे मिळती जुळती असल्याने एकत्रच होते. परंतु आता राजकारणाचा अगदी खेळखंडोबा झाल्याचे दिसत आहे. तत्व, विचारसरणी, ध्येय धोरणे याचा सुतराम संबंध राहिलेला नाही. सत्तातुराणां न भयं न लज्जा अशी काहीशी परिस्थिती झाली आहे. आता हेच पहा, राज्यात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे यांची महाविकास आघाडी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष तत्वाशी बांधलेले आहेत. हिंदुत्वाची भूमिका त्यांना मान्य नाही. काँग्रेसचा स्वातंत्रवीर सावरकरांना तीव्र विरोध आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी सावकराविरोधात अत्यंत कठोर भाषेत टीका करतात. त्यासाठी त्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल झाले, न्यायालयात खेटे घालावे लागले. परंतु राहूल गांधींनी आपली भूमिका सोडली नाही. परंतु त्यांच्याच आघाडीत असलेल्या उध्द्व ठाकरे यांना सावरकर पूजनीय आहेत. सावरकरांवर टीका केलेली त्यांना चालत नाही. शिवाय ठाकरे हिंदुत्व सोडले नसल्याचेही सांगतात. मग ठाकरे आणि काँग्रेस एकत्र कसे असा प्रश्न सामान्यांना पडला तर नवल नाही. त्या प्रश्नाचे उत्तर आहे केवळ सत्ताप्राप्ती. आता याच आघाडीतील दुसरे दोन पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी पहा. काँग्रेसचा उद्योगपती गौतम अदानींना विरोध आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी गेल्या पाच वर्षाहून अधिक काळ गौतम अदानीवर चौफेर टीका करीत आहेत. विधान सभा निवडणुकीत त्यांनी प्रत्येक प्रचार सभेत गौतम अदानींनाच टीकेचे लक्ष केले. दुसरीकडे शरद पवार आणि गौतम अदानीचे सलोख्याचे लंबंध लपून राहिलेले नाहीत. भाजप, राष्ट्रवादीच्या तडजोडीच्या बैठकीत अदानी असतात याचीही सर्वत्र चर्चा होते. एवढेच काय गौतम अदानी जेव्हा बारामतीला आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य रोहित पवारांनी केले हे सा-या देशाने पाहिले. मग राहूल गांधीचा अदानींना विरोध करुन काय फायदा? ज्यांच्या भरवंशावर तुम्ही निवडणुका लढता, सरकार चालविता तेच लोक जर अदाणीला मिठी मारत असतील तर तुमचा विरोध परिणामकारक कसा होईल? याचे ही उत्तर पुन्हा सत्ताप्राप्ती. काँग्रेसचे सावरकर मुद्यावरुन उध्दव ठाकरेशी मतभेद, काँग्रेसचे गौतम अदाणीवरुन राष्ट्रवादीशी (श.प.) मतभेद तरीही हे तिघे आघाडी करुन एकत्र निवडणुका लढतात. याचा अर्थ या लढाईत तत्वांना तिलांजली असून केवळ सत्ताप्राप्तीसाठी हे एकत्र आले आहेत हे दिसून येते.
दुस-या बाजुलाही परिस्थिती वेगळी आहे अशातला भाग नाही. पार्टी विथ डिफरन्स असा भाजपाचा कधीकाळी नारा होता. मग हळू हळू तेही राजकारणात इतरांसारखेच रुळले. शिवसेनेत फूट पाडून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंना त्यांनी बरोबर घेतले. पूर्वी भाजप-शिवसेना युती होतीच. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाणे लोकांना एवढे अनैसर्गिक वाटले नाही. परंतु पूर्ण बहुमताचे सरकार असतानाही राष्ट्रवादीत फूट पाडून त्यांनी अजितदादांना बरोबर घेतले. दादावर सुरुवातीला सिंचन घोटाळ्याचे आरोप यांनीच केले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर सभेत सिंचन घोटाळा काढला. मग अजित दादांना सोबत घेतले. अजितदादांनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा निर्वाळाही दिला. तो मुद्दा बाजुला ठेवा. या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचाराला आले. त्यांनी बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा काढला. त्याला अजितदादांनीच आक्षेप घेतला. महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांना मानणारा आहे. इथे योगी आदित्यनाथांची विचारसरणी चालणार नाही असे दादांनी जाहीरपणे सांगितले म्हणजे भाजप, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचेही विचार एकमेकांना पटणारे नाहीत. अजितदादा भाजप आणि एकनाथ शिंदेसोबत आले असले तरी त्यांनी त्यांची मुळ विचारसरणी सोडली नाही हे त्यांनी जाहीरपणे सांगितले. तरीही ते एकत्र कसे हा प्रश्न शिल्लकच राहतो. याचेही उत्तर सत्ताप्राप्ती हेच आहे. विरोधाभास पहा कसा आहे. एकत्र लढूनही अनेक मतदार संघात मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एकमेकाविरुध्दच उमेदवार उभे केले. रामटेकची जागा शिवसेनेने चिकाटीने सोडवून घेतली. तिथे काँग्रेसचा बंडखोर उभा आहे. त्यावर ऊबाठाचे विदर्भ प्रभारी भास्कर जाधव यांनी काँग्रेसचे नेते सुनिल केदार यांच्यावर टीका केली. सुनिल केदार शंकराच्या बेंबीतला विंचू आहे असे भास्कर जाधव म्हणाले. दुसरीकडे नांदेड उत्तर मतदार संघात काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात उबाठाच्याच संगीता पाटील डक उभ्या आहेत. तेही मशाल चिन्ह घेऊन लढत आहेत. मग रामटेकला एक, नांदेड उत्तरला दुसरा न्याय कसा लागू होईल? ज्यांची विचारसरणी एक नाही, ज्यांची ध्येय धोरणे एक नाही, ज्यांच्या निष्ठा एक नाहीत, व्यवहारात तफावत आहे ते लोक किती काळ एकत्र राहतील? याचा अर्थ ही निवडणूक कोणीही जिंको महाराष्ट्रात स्थिर सरकार येणार नाही हे निश्चित आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. ही लढाई केवळ सत्तेसाठी आहे. निकालानंतर अशीच लढाई मुख्यमंत्रीपदासाठी होणार आहे. शरद पवारांना कोणत्याही परिस्थितीत सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री करायचे आहे. शरद पवार-अजितदादा जो संघर्ष सुरु आहे तोही याच कारणाने असे म्हणण्यास वाव आहे. जे अजितदादा यापूर्वी आठ वेळा बारामतीतून आमदार झाले त्यांना यावेळी शरद पवारांचा एवढा टोकाचा विरोध का? सकाळचा शपथविधी झाल्यानंतर अजितदादांना स्वगृही परत आणण्यासाठी प्रतिभा पाटील पहिल्यांदा घराबाहेर पडल्या. त्याच प्रतिभाताई आज अजितदादांच्या विरोधात प्रचाराला उतरल्या. उध्दव ठाकरे यांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यांची इच्छा तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेऊनच निवडणुका लढवावयास पाहिजे होत्या अशी होती. एकनाथ शिंदे तर विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढविली जात आहे. त्यांचा दावा असणे हे नैसर्गिक आहे. भाजपला तर काँग्रेस आणि भाजप राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारे पक्ष ठरणार असल्याने ज्याच्या सर्वाधिक जागा त्याचा मुख्यमंत्री हे युतीःआघाडीचे धोरणच आहे. ही सर्व परिस्थिती पाहता निकालानंतर या ग्रेट इंडियन सर्कसचे खेळ अधिक जोमाने सुरु होतील. कोणत्या झोक्यावरुन कोण कोणीकडे उडी मारेल सांगता येणार नाही. संपूर्ण देशात अग्रेसर राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अशी रसातळाला गेली हे खरे दुर्देव आहे. सामान्य माणसाच्या हातात हतबल होऊन पाहण्या व्यतिरिक्त काहीही नाही.