कारंजा: गेल्या पाच वर्षापासून साप्ता.करंजमहात्म्य परिवाराकडून,ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना सतर्क करण्यासाठी आम्ही पावसाचे अंदाज प्रकाशित करीत असल्यामुळे,दररोज आम्हाला राज्यातील शेतकऱ्यांकडून पावसाच्या अंदाजाची विचारणा होत असते.परंतु आम्ही राज्यातील हवामान विभाग आणि आमचे मित्र वाशिम जिल्ह्याचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्या अंदाजावरूनच शेतकऱ्यांना माहिती पुरवीत असतो.असे स्पष्ट करतांना शेतकरी मित्र संजय कडोळे यांनी पुढे सांगीतले की,गेल्या मे महिन्यात तापमानाने उच्चांक गाठलेला असतांना,अचानक बंगालच्या उपसागरात झालेल्या घडामोडी मुळे,राज्यात अवकाळी पाऊसही सर्वदूर पर्यंत चांगलाच बरसला होता.त्यातच केरळमध्ये आणि राज्याच्या सिमावर्ती भागात,मान्सूनचे आगमनही अपेक्षेपेक्षा दहा बारा दिवस अगोदरच झाले.मात्र पर्यावरणीय बदलांमुळे मान्सूनची प्रगती थांबली आणि विदर्भात तर पुन्हा उन्हाळ्याचे प्रखर दिवस अनुभवायला मिळाले असून प्रचंड उकाडा वाढलेला आहे.हे उकाड्याचे दिवस जून अखेरपर्यंत कायमच राहणार असल्याची शक्यता आहे.मात्र येत्या रविवारी दि.०८ जूनच्या पूर्वसंध्येला शनिवारी दि. ०७ जून, दि .८ जून, दि ०९ जून आणि १० जून रोजी,राज्याच्या अनेक भागात दुपारनंतर बारिक सारिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यानंतर दि १३ ते १७ जून दरम्यान मुंबई, कोकण किनारपट्टी, पाश्चिम महाराष्ट्र,पुणे, उत्तरमहाराष्ट्र,खांदेश, मराठवाडा, पूर्व विदर्भाच्याकाही भागात पूरस्थिती निर्माण करणारा मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे.त्यामुळे नदी नाल्याच्या काठावर राहणाऱ्या लोकांनी सतर्क व्हावे.राज्याच्या काही भागात विजाच्या कडकडाटात पाऊस होऊन विजा पडण्याचा संभव असल्यामुळे,आपण सतर्क व्हावे. वाशिम जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्याच्या शेतजमिनीची नांगरणी वखरणी मशागत पूर्ण झाली असून आता त्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.मात्र तूर्तास पेरणीयोग्य पाऊस होणार नाही तर पेरणी योग्य पाऊस हा जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याचा अंदाज आहे.आणि शेतकऱ्यांनी,चांगला पाऊस होऊन पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरल्याशिवाय आणि मुख्य म्हणजे कृषी विभागाच्या सल्ल्या शिवाय पेरण्या करूच नये.तसेच आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी पावसाळी वातावरण तयार होताच दुपार नंतर शेतातून घरी परतावे.विजांचा लखलखाट होत असल्यास लगेच आपल्या जवळचे मोबाईल डाटा बंद करून स्विच ऑफ करावे., शेतात थांबू नये.हिरव्या झाडाचा आश्रय घेऊ नये.आपल्या शेळ्यामेंढ्यांची आणि गुराढोरांची विशेष काळजी घ्यावी.अतिवृष्टी होऊन पाऊस वाढल्यास पांदण रस्ते, नदी नाले व पुलावरून स्वत : जावू नये.व आपली दुचाकी,चारचाकी वाहने, बैलबंड्या व गुरेढोरे नेऊ नये. जीवन हे अनमोल आहे.त्यामुळे स्वतःची,कुटूंबियांची व गुराढोरांची सुरक्षा करावी. वादळी पावसामुळे शेतात किंवा गावात विजेच्या तारा तुटण्याच्या, विद्युत पुरवठा बंद होण्याच्या घटना सतत घडत असतात. अशावेळी सतर्क राहून रात्रीच्या अंधारात प्रकाशासाठी आपल्या घरामध्ये पर्याची व्यवस्था करावी. घराबाहेर पडतांना छत्री,रेनकोट, विजेरी म्हणजे टॉर्च सोबत ठेवावी.अचानक उद्भवणाऱ्या आपात्कालिन परिस्थिती करीता तलाठी, पटवारी, ग्रामसेवक, तहसिलदार, कृषी सहाय्यक, आरोग्य अधिकारी, फॅमिली डॉक्टर यांचे संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक प्रत्येक शेतकरी शेतमजूरांनी आपल्याकडे असू द्यावे.असे आवाहन शेतकरी मित्र तथा साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे प्रमुख संजय कडोळे यांनी ग्रामस्थ शेतकऱ्या करीता केले आहे.