रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पेठ वार्ड परिसरात दिनांक 13/10/2025 चे रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने बंद घराचा दरवाजा तोडून घरातील सोन्याचे दागिने तसेच दुसऱ्याच्या घरातील मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. ब्रम्हपुरी पोलिसांनी सदर घटनेतील आरोपीचा अवघ्या चार तासात शोध घेत आरोपीस बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनीराम नकटूची मेश्राम वय 71वर्ष रा. पेटवार्ड ब्रह्मपुरी हे दिनांक 12 ऑक्टोबर 2025 ला आपले घराचे दरवाजाला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना अज्ञात आरोपीने रात्रीचे वेळेस त्यांचे घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटामध्ये असलेले 23000/- रुपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले दागिने तसेच हजार रुपये किंमतीचा नोकिया कंपनीचा कीपॅड मोबाईल असा एकूण 24,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादी धनीराम मेश्राम यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला दिली. प्राप्त तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 331(4),305(A) प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे . तर दुसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी सोहेल नूरखान पठाण वय 32 वर्ष रा.पेठ वार्ड, ब्रह्मपुरी यांचे घराचे बांधकाम सुरू असून घराला दरवाजे नसल्यामुळे सदर घरात फिर्यादी सोहेल पठाण हे झोपलेले असताना अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून 30,000/- रुपये किमतीचा Realme GT8 व 10,000/- रुपये किंमतीचा IQOO कंपनीचा असे एकूण 40,000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. फिर्यादीने पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी विभाग राकेश जाधव व पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. मनोज खडसे व सोबत पोहवा योगेश शिवणकर, पोहवा मुकेश गजबे, पोहवा अजय कटाईत, पोशि इरशाद शेख, निलेश तुमसरे स्वप्निल पळसपगार, पोशि चंदू कुलसंगे,वशिष्ठ रंगारी असे मिळून आरोपीचा शोध घेत असताना, रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक अनोळखी संशयित इसम मिळून आला. त्याची विचारपूस केली असता, त्याचे नाव श्रीकांत उर्फ बोटतुट्या राजू जुनारकर वय 22 वर्ष रा. चंद्रपूर असे माहिती झाली. सदर इसम हा चंद्रपूर येथील रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती झाल्याने सदर आरोपीची झडती घेतली असता, त्याचेकडे मोबाईल व सोन्याचे दागिने मिळून आल्याने त्याचे कडून 63,000/-रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. सदर आरोपीस ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा मुकेश गजबे व पोहवा अजय कटाईत हे करीत आहेत.