वैशाख कृष्ण दशमीला श्री संत मुक्ताबाई यांचा ७२५ वा अंतर्धान दिन (समाधी सोहळा) आहे. अचानक वीज कडाडली तेव्हा मुक्ताबाई गुप्त झाली. वैकुंठधामी मुक्ताबाई स्वरुपाकार झाल्या. मुक्ताई यांच्या अभंगाचा थोडक्यात भावार्थ बघू या.
मुंगी उडाली आकाशी ।
तिने गिळिले सूर्याशी ।।
मला वाटत की, संत मुक्ताबाईंना असे सांगायचे असेल की, एवढीशी मुंगी पण ती जिद्द आणि चिकाटीने सूर्यापर्यंत पण पोहचू शकते. मुंगी हे सुक्ष्म जीवात्म्याचे रुप आहे. संत मुक्ताबाईंना साधना काळात हा आलेला अनुभव आहे. त्यांनी प्रत्यक्ष आपल्या अभंगातून सांगितलेला आहे. जो कोणी आध्यात्मिक साधना करीत असेल त्यांच्याकरिता मार्गदर्शक असा हा उच्च कोटीचा अभंग आहे. आपण संत मुक्ताबाईच्या मूळ अभंगाचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करु या.
मुंगी उडाली आकाशी ।
तिने गिळिले सूर्याशी ।।
मुंगी हा किती छोटासा जीव आहे. तिने कितीही प्रयत्न केले तरी सूर्याला गिळणे किंवा त्याच्या जवळपास जाणे ही शक्य नाही तरी सुद्धा मुक्ताबाई असे का म्हणाल्या. त्या गोरक्षनाथ यांच्या शिष्या होत्या आणि महान योगी होत्या. संत नामदेवांना गोरोबाकाका यांच्या मार्फत कच्च मडकं ठरवू शकत होत्या. तसेच चौदाशे वर्षे जगणाऱ्या चांगदेवांना उपदेश करून त्यांच्या आध्यात्मिक गुरु झाल्या. अशा महान संत उगाच काहीतरी कसे लिहील. संत मुक्ताबाईंना मुंगीची उपमा दिली तरी काही हरकत नाही, असं मला वाटत.
मुक्ताईने एक त्राटक क्रिया सांगितली. आकाशात आपणांस एका मुंगी इतका काळसर ठिपका दिसेल. त्याच्यावर एक कटाक्ष नजर टाकून स्थिर करावी. आपल्या डोळ्यातून कोटी सूर्या इतका प्रकाश निर्माण होईल. त्यामुळे आपणांस सूर्य सुद्धा दिसेनासा होईल. झाडे, डोंगर, घरेच नाही तर पूर्ण सृष्टी यापैकी काहीच दिसत नाही. सर्वत्र प्रकाशच दिसतो म्हणून मुक्ताबाई म्हणाल्या. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी.
थोर नवलाव झाला ।
वांझे पुत्र प्रसवला ।।
संत मुक्ताबाई म्हणतात, असे नवल घडले की वांझ व्यक्तीला म्हणा अगर स्त्रीला म्हणा पुत्र झाला हे शक्य आहे का? तर अजिबातच नाही. मग त्या असे का म्हणाल्या. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर त्या म्हणतात. येथे वांझोटी कोण? याचा विचार केला तर लक्षात येत की, आपली नजर वांझ होते तेव्हाच आत्मप्रकाश प्रकटतो. नजर वांझ करून तिला आतल्या बाजूस वळवली तर ती वांझ झाली असे म्हणावे आणि ती जेव्हा वांझ होते तेव्हाच तीला प्रकाशरुपी पुत्र होतो. म्हणून थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला.
विंचु पाताळासी जाय ।
शेष माथा वंदी पाय ।।
विंचु म्हणजे आपला अहंकार हा पाताळात गेला म्हणजे त्यावर आपण विजय मिळवला तर आपलं मन आणि चित्त शुद्ध होत, त्यानंतर शेषशाही भगवंत जो आपल्या डोक्याच्या भागातील ब्रम्हरंध्राजवळ राहतो. त्याचे दर्शन होते तेथेच शेष या आत्मरुपी भगवंताला वंदन करत आहे म्हणून संत मुक्ताई म्हणतात. अहंकार रुपी विंचुवर ताबा मिळवा. प्रत्यक्ष भगवंत आपल्या देहात भेटेल.
माशी व्याली घार झाली ।
देखोनी मुक्ताई हासली ।।
या ओळीत संत मुक्ताबाई एक क्रिया करावयास सांगतात. स्वच्छ, निर्मळ आकाशात आपणास काळ्या रंगाचा छोटासा बिंदू दिसतो. जसंजसं ही त्राटक क्रिया वाढत जाईल तसंतसं त्या छोट्या बिंदूला पंखासारखे आकार असलेले दिसेल, ते इतके मोठे होत जातात की पूर्ण आकाश नाही तर सृष्टी व्यापून जाते. जिज्ञासूंनी गुरुच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यावा. म्हणून मुक्ताईंना अशी नवलाईची गोष्ट वाटून आनंदाने हसू येत आहे.
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....