ब्रम्ह हे सर्वातच भरले आहे पण ते आपल्याला गुरुशिवाय कळणार नाही. गुरु करावाच लागेल. राष्ट्रसंत म्हणतात, "तनमें करो कोई खोजजी, आनंद कंद है । गुरु के कृपाबिन ना खुले, ताल बंद है ।।" परमात्मा सर्व घटात परिपूर्ण आहे मात्र त्याला जाणण्याचा मार्ग गुरुकृपेने कळतो. आजकाल गुरुचा व्यवसाय करणाऱ्या गुरुचा जगभर सुकाळ असला तरी किल्लीवाला गुरु ओळखणे फार कठीण आहे. जो सर्व जीवमात्राला ब्रम्ह समजून वागतो. आपल्या आणि दुसऱ्या जीवात भेद समजून वागत नाही हा उत्तम गुरु समजावा. हा श्रीमंत तो गरीब, तुम्ही अलिकडे या, तुम्ही पलिकडे जा असा भेदभाव समजून वागणाऱ्या जवळ किल्लीच नाही. तो गुरुच नव्हे. राष्ट्रसंत म्हणतात, "जो खासकी पहिचान दे, वैसे गुरुपर जान दे । बिन सद्गुरुकी हो दया, अनुभव कभी ना आयेगा ।।" गुरुमध्ये ध्येयापर्यंत पोहचण्याची क्षमता असावी. नुसता गुरु अधिकारी असून चालत नाही. गुरु म्हणजे अंधाराची काजळी पुसून टाकणारा दैवी प्रकाश आहे. गुरु सदाचारी, नम्र, प्रेमळ, सहानुभूती पूर्वक असावा. गुरुने आपल्या आचरणातून शिष्यासाठी एक आदर्श निर्माण केला पाहिजे.
मनाला स्थिर करवाया, धरी गुरु-प्रेम हृदयी या ।
तयाविण अन्य ना कोणी, मनाला बोधवी सखया ।।धृ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या या भजनात मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी गुरुदेवाच्या प्रेमळ कृपेची आवश्यकता आहे असे म्हटले आहे. गुरुदेवाच्या प्रेमाला आपल्या हृदयात स्थान द्यावे. गुरुच्या प्रेमाशिवाय मनाला शांती मिळू शकत नाही. गुरु सारखा मनाला योग्य मार्गदर्शन, ज्ञान देणारा दुसरा कोणी नाही. गुरुदेव अज्ञान दूर करतात आणि योग्य ज्ञान , नीती, जीवनशैली शिकवतो. "गुरुविना जीवन म्हणजे नकाशाविना केलेल्या प्रवासाला वाट मिळेल पण दिशा नाही." गुरुशिवाय ज्ञान अपूर्ण असत.
गुरु तो आदि अंतीचा, गुरु अधिकार शांतीचा ।
गुरु निवृत्त भ्रांतीचा, प्रगटला देह ताराया ।।१।।
गुरु हाच आदि आणि अंत आहे. गुरु हाच सुरुवातीला आणि शेवटी असतो म्हणजेच गुरु हे ज्ञानाचे अंतिम ध्येय आहे. गुरु हाच ज्ञानाचा आणि आध्यात्मिक मार्गाचा आरंभ बिंदू आहे. गुरु हा ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा आहे. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरुच्या अधिकारात शांती किंवा शांतता मिळते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक शांती, आंतरिक शांती, समाधानाची प्राप्ती होते. गुरुच्या उपदेशानुसार आचरण करुन जो स्वतःला सांसारिक दुःखापासून दूर ठेवतो आणि आध्यात्मिक प्रगती करतो त्याला शांतीचा अनुभव होतो. गुरु निवृत्त भ्रांतीचा म्हणजे गुरुच्या ज्ञानाने अज्ञान किंवा संशयाचा अंधकार दूर होऊन मनाला शांती मिळते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे किंवा आध्यात्मिक ज्ञानाची ओढ असेल त्याला गुरु मिळाल्यावर त्याचे सर्व संदेह दूर झाले तर तो व्यक्ती निवृत्त भ्रांतीच्या स्थितीत पोहोचतो. गुरुदेव देह ताराया प्रगटला म्हणजे आपल्याला सांसारिक बंधनातून, दुःख आणि मायाजालातून मुक्त करतो. जसे ज्ञानेश्वरांनी आपल्या देहाचा त्याग करुन मोक्ष मिळविला. गुरु आपल्याला मोक्षाचा अधिकारी बनवितात.
तयाविण अन्य जे जाती, मिटेना भवभय भ्रांती ।
गुरु तो अंति सांगाती, कठीण भवधार ताराया ।।२।।
जगात असलेला व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा असला तरी तो भवभय भ्रांतीत अडकतो. भव म्हणजे जग, संसार. भय म्हणजे भीती, सांसारिक भीती. भ्रांती म्हणजे भ्रम, गैरसमज. जगाच्या भीतीमुळे किंवा संसाराच्या मायाजालामुळे भ्रम किंवा गैरसमज येतो. सांसारिक गोष्टीमध्ये गुंतल्यामुळे माणसाला खरा अनुभव आणि परिस्थिती नीट समजू शकत नाही. उदाः- एखाद्या व्यक्तीचे काहीतरी वाईट होईल किंवा त्याचे नुकसान होईल अशी भीती वाटत असेल तर ती भवभय भ्रांती असू शकते. शेवटी फक्त गुरुच सोबत असतो किंवा शेवटच्या क्षणी म्हणजे मृत्यू समयी फक्त गुरुच सोबत असतो गुरुदेवानी दिलेला मंत्रजप शेवटी घेणे जरुरी आहे. जेव्हा माणूस मृत्यू पावतो तेव्हा त्याची सर्व सांसारिक नाती, संपत्ती, सुख दुःख सगळं काही येथेच संपून जात. फक्त त्याने केलेले सत्कर्म आणि त्याला मिळालेले गुरुचे ज्ञान त्याचे सोबत असते. "गुरु बिन कौन बतावे बाट । बडा विकिट यमघाट ।।" अशी ही गुरुची किमया संपूर्ण आयुष्यात जे सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. गुरु आपले परम दैवत आहे. गुरुशिवाय तरणोपाय नाही.
तयाचे शब्द ऐकावे, मनी स्थिरवुनी मुरवावे ।
तरीच पद मोक्ष ते पावे, भजा गुरु नाम वदनी या ।।३।।
तयाचे शब्द ऐकावे म्हणजे गुरुदेवाच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांचे बोलण्यावर विश्वास ठेवावा. त्यांनी जो उपदेश किंवा ज्ञान !दिले ते आपल्या मनात, विचारामध्ये आणि आचरणात पूर्णपणे उतरवणे. गुरुदेवांनी दिलेला सल्ला किंवा ज्ञान !आपल्या जिवनात प्रत्यक्षपणे अमंलात आणले पाहिजे. मोक्ष पदाला पोहचायचे असेल तर गुरुदेवांनी दिलेल्या मंत्राचा जप करावा. मोक्षपद पावणे म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करुन घेणे होय. "आधी गुरुशी वंदावे, मग साधन साधावे" सांसारिक बंधनातून पूर्णपणे मुक्त होऊन आत्मिक शांती आणि परमानंद मिळवणे. मोक्ष प्राप्त होणे म्हणजे परत जन्ममरण नको.
निभवला काळ तुकड्याचा, निभवी हा भाव अंतीचा ।
धन्य अधिकार तो त्याचा, किती वर्णू मी वदनी या ।।४।।
राष्ट्रसंताचा काळ निभवला. निभवला म्हणजे एखाद्या गोष्टींची जबाबदारी पूर्ण करणे. निभवी म्हणजे पार पाडणे. भाव अंतीचा म्हणजे मनातील किंवा हृदयातून येणारा खरा आतंरिक भाव किंवा खरे विचार. जर एखाद्या व्यक्ती नाराज असेल तर ती अंतरीचा भाव व्यक्त करते. गुरुचा अधिकार धन्य आहे. गुरुदेवाने दिलेला उपदेश अंगीकारणे आणि त्यानुसार वागावे. गुरु शिष्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी ज्ञान देतो. शिष्याने गुरुचा अधिकार वदनी वर्णावे. गुरुने दिलेले ज्ञानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवावे. गुरु हा शिष्यासाठी देवाप्रमाणे असतो. त्यांच्या उपदेशातून शिष्याला ज्ञान, भक्ती, मोक्ष मिळतो.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....