"आपले जीवन जगत असतांना अनेक व्यक्ती स्वकतृत्वाने समाज विकासाचा ध्यास घेऊन, इतरांकरीता जीवन जगून, मृत्युनंतरही आपल्या किर्तीचा सुगंध दरवळत ठेवतात.अशाच व्यक्तिमत्वाचे धनी म्हणजे स्व. मुकूंदराव उपाख्य नानासाहेब काशीराव देशमुख हे होत." येत्या दि. ०९ जानेवारी २०२५ रोजी, श्रीगणेश भक्तांमध्ये सुप्रसिद्ध ठरलेल्या वाशिम येथून जवळच असलेल्या हिवरा (गणपती) या गावखेड्यामध्ये त्यांचे पुण्यस्मरण साजरे होत आहे.त्यामुळे त्यांच्या जीवनचरीत्रावर कटाक्ष टाकण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न.हिवरा (गणपती) येथील सुसंस्कृत व घरंदाज असलेल्या देशमुख घराण्यातील काशीराव देशमुख आणि गीताताई देशमुख या आईवडिलांचे नानासाहेब उपाख्य मुकुंदराव देशमुख हे चिरंजीव होते.त्यांचा जन्म दि. ३०ऑक्टोंबर १९५९ रोजी झाला. त्यांचे कुटूंब एकत्र कुटूंबपद्धतीचे पुरस्कर्ते आणि धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात तसेच स्थानिक राजकिय क्षेत्रातही अग्रेसर होते. नानासाहेबांना विनायकराव, विश्वासराव,स्व.भरतराव, अरविंदराव,किशोरराव ही भावंडे तर स्व.कुमूदिनी,मालाताई, सविताताई ह्या बहिनी आहेत. त्यामुळे बालपणात नानासाहेबांना एकत्र कुटूंबाचे चांगले प्रेम व मार्गदर्शन मिळाले.नानासाहेबांना त्यांचे काका माणिकराव रामचंद्र देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यांचे भाऊ विश्वासराव देशमुख हे तंटामुक्ती समितीचे अध्यक्षही होते.तर दुसरे भाऊ पंजाबराव देशमुख हे हिवरा गावचे पोलीस पाटील होते.त्यामुळे त्यांच्याकडूनही नानासाहेबांना सामाजिक समस्यांची जाण होऊन, समाजसेवेची प्रेरणा मिळत गेली. नानासाहेबांचे शिक्षण पूर्ण होताच कुटूंबियांकडून त्यांचेवर वडिलोपार्जित पारंपारिक शेतीची जबाबदारी सोपविण्यात आली. व नानासाहेबांनीदेखील शेतीची जबाबदारी स्वकतृत्वाने लिलया सांभाळून आपण कुशल शेतिनिष्ठ असल्याचे सिद्ध करून दाखवीले.नानासाहेब शेतीत चांगले रममाण झाल्याचे पाहून उपवर झाल्यावर त्यांचा विवाह हादगाव येथील देशमुख कुटूंबाची कन्या उषाताई यांचेसोबत करण्यात आला. त्यांच्या संसार वेलीवर त्यांना लक्ष्मीकांत आणि निखिल ही दोन मुले तर भारती आणि निलिमा ह्या दोन मुली झाल्या. आपल्या कुटूंबासोबतच आईच्या माहेर कडील कुटूंबियातही नानासाहेब सर्वांच्या आवडीचे ठरले.त्यांचे मामा बाबुराव उपाख्य नारायणराव देशमुख हे शिक्षक होते.दुसरे व तिसरे मामा लक्ष्मणराव आणि रामराव हे जिल्हा परिषद मध्ये लेखापाल होते तर चौथे मामा भरतराव देशमुख आगार व्यवस्थापक होते. मामासाहेबांच्या सहवासाने देखील त्यांना समाजकारण करण्याची प्रेरणा व उत्तमोत्तम मार्गदर्शन मिळत गेले.त्यातून ते गावगाड्याच्या हितासाठी विविध सामाजिक उपक्रमात भाग घेऊ लागले.होतकरू विद्यार्थी,कष्टकरी शेतकरी, सर्वाशी मिळून मिसळून प्रेमाने वागणारा तरुण अशी त्यानी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.त्यामुळे गावकरी मंडळीच्या अपार प्रेमामुळे वयाच्या १९ व्या वर्षी ते आपल्या हिवरा गावाचे तरुण सरपंच झाले.पुढे त्यांचे शांत, मनमिळाऊ व विश्वासू व्यक्तिमत्व बघता आप्तस्वकिय आणि गावकरी मंडळीकडून त्यांना नाना ही उपाधी मिळाली.व लवकरच ते नानाचे नानासाहेब झाले.पुढे पंचक्रोशीत मुकूंदरावांना नानासाहेब ह्या टोपणनावानेच ओळखले जाऊ लागले होते.अशा नानासाहेबांनी सरपंच पदावर कार्यरत असतांना वरिष्ठ राजकिय पुढारी आणि जिल्हा परिषद अधिकारी वर्गाशी समन्वय साधून गावकऱ्यांच्या हितासाठी गावामध्ये जात पात धर्म न पहाता,तळागाळातील, गरजू गोरगरीब व बहुजन वर्गाच्या हितासाठी शासनाच्या विविध योजना यशस्वीरित्या राबवून गावाचा विकास घडवून आणला.नानासाहेबांच्या पुढाकारातूनच हिवरा येथील गणपती मंदिराचे निर्माण करण्यात आले.आज भाविकांच्या मनोकामना पूर्ण करून,नवसाला पावणारा गणपती म्हणून हिवरा येथील गणपतीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख असून,हिवरा गाव देखील हिवरा (गणपती) म्हणून ओळखल्या जात आहे.दरवर्षी येथील श्रीगणेशोत्सव सर्वधर्मिय समाजातील लोकं गुण्यागोविंदाने एकत्र येवून साजरा करतात. अखेरच्या दिवशी पंचक्रोशितील भाविकांसाठी भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडतो.नानासाहेबांनी आपल्या कार्यकालात ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता अभियान,वृक्ष लागवड व संवर्धन,आरोग्य शिबीरे,वैद्यकीय सुविधा कॅम्प आदींचे आयोजन वेळोवेळी केले.गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला वाव मिळण्यासाठी उत्तम दर्जेदार संगणकिय शिक्षण मिळावे यासाठी शाळा डिजीटल करण्याचे काम केले.त्यामुळे आज हिवरा (गणपती) येथील जिल्हा परिषद शाळेमधून पुढे गेलेली गोरगरीबांची मुले उच्चशिक्षीत होऊन नोकरीमध्ये मोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत. शिवाय त्यांच्या प्रेरणेने त्यांचे कुटूंबिय मुले मुली शैक्षणिक-सामाजिक-व्यावसायिक व कृषी क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहेत.अशा प्रकारे यशस्वी वाटचाल करीत असतांनाच नानासाहेब आजारी झाले. कुटूंबीयांनी त्यांना उपचाराकरीता मुंबई पर्यत नेले परंतु त्यांचा आजार बरा झाला नाही.अखेरीस आपल्या सामाजिक कार्याचा वसा मुलाबाळांच्या हवाली करून दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.ते देवाला प्रिय झाले.आज जरी नानासाहेब आपल्यात नसले तरी त्यांच्या सुखद आठवणी आप्तस्वकिय, मित्रमंडळी आणि गावकरी यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रेरणा देत राहतील. अशा विश्वासाने त्यांच्या स्मृतीदिनी पुण्यस्मरणानिमित्त त्यांना त्रिवार वंदन ! विनम्र अभिवादन !! करतो आणि इथेच थांबतो.
शब्दांकन : प्राचार्य डॉ. के. बी.देशमुख.दत्तनगर,रिसोड रोड,लाखाळा वाशीम.