वाशिम : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा विधीज्ञ संघ व ॲड.रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त वतीने 13 ऑक्टोबर रोजी मानव तस्करी विरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी.पांडे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले. यावेळी मुख्य लोक अभिरक्षक ॲड. परमेश्वर शेळके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री.टेकवाणी, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश झंवर व ॲड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश दाभाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या रॅलीला जिल्हा व सत्र न्यायालय येथून सुरुवात होवून जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगर परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय या मार्गाने जावून अकोला नाका ते ॲड.रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत 150 पेक्षाही जास्त विद्यार्थी, विधी स्वयंसेवक, कर्मचारी सहभागी होते. रॅलीत मानव तस्करी विरोधी घोषणा देत नागरीकांचे लक्ष वेधले. विधी स्वयंसेवक शाहीर इंगोले यांनी पोवाडयाच्या माध्यमातून नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली.रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात टेकवाणी,झंवर व दाभाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहायक लोक अभिरक्षक राहुल पुरोहित यांनी सायबर सुरक्षा सप्ताहानिमित्ताने सायबर गुन्हेगारीपासून बचाव करण्याकरीता घ्यावयाची दक्षता या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हा मुख्यालयातील न्यायीक अधिकारी, विधीज्ञ मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, न्यायालयीन कर्मचारी,विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, समाजकार्य महाविद्यालयोच विद्यार्थी व विधी स्वयंसेवक यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.