वाशिम : निवडणूका येतात आणि जातात.परंतु जनतेवर शासन करणाऱ्या राजकिय पक्षांनाच मुळात बेघर व भूमिहिन भटक्या जमातीची आणि वयोवृद्ध,निराधार,दिव्यांगांची दयामाया नसल्याचा प्रत्यय प्रत्येक वेळी जनतेला येत असल्याची तक्रार संजय कडोळे यांनी केली आहे.यासंदर्भात अधिक वृत्त असे की,गेल्या अनेक वर्षापासून भटकंती करणारे भटक्या विमुक्त जाती जमाती मधील शेकडो कुटूंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भटकंती करणाऱ्या जनतेमधून चर्चीला जात आहे.आपल्या रोजमजूरी आणि उदरनिर्वाहासाठी गोंधळी,भाट, कंजरभाट,वैदू, गोसावी,जोशी,नाथजोगी, मसनजोगी,रामोशी,बेलदार, कैकाडी,चित्रकथी,गारूडी, मांगगारुडी,नंदीवाले, पांगूळ,गोपाळ,गवळी,भोई, भराडी,जंगम,सिकलकर, छप्परबंद इत्यादी समाजाची मंडळी या गावातून त्या गावात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात भटकत असतात.त्यामुळे यापैकी 90% कुटूंबे पालावर किंवा मातीच्या कच्च्या घरात कुठे मंदिराच्या आश्रयाला तर कुठे स्मशानाच्या आश्रयाला रहात असतात. कुठे बाजारात तर कुठे मोकळी दिसेल त्या जागेवर झोपडी बांधून रहातात.मात्र अद्यापपर्यंत सुद्धा शासनाकडून ह्या कुटूंबाच्या आवासा करीता कायमस्वरूपी उपाय योजना झालेली नाही. त्यांना ते हल्ली रहात असलेल्या तात्पुरत्या अतिक्रमणाचे जागेवर किंवा सरकारी भूखंड, मंदिर,देवस्थान,दरगाह इत्यादी ठिकाणी रहात असलेल्या जागेवर शासन त्यांना प्रधानमंत्री आवास योजना किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेतून त्यांना शासनाकडून निवासासाठी कायम स्वरूपी घरकुले मिळत नाहीत.त्यांची रोजमजुरीची आणि उदरनिर्वाहाची सोय होत नाही.एवढेच नव्हे तर ह्या गरजू निराधारांच्या (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) संजय गांधी योजना विभागाकडून मिळणार्या तुटपुंज्या अनुदानात, प्रचंड महागाईला अनुसरून वाढ सुद्धा केली जात नाही.तसेच यातही दुदैवाची गोष्ट म्हणजे कमितकमी निवडणूकीच्या तोंडावर देखील एकही राजकिय पक्ष त्यांचे मतदार असलेल्या ह्या भटकंती करणाऱ्या भटक्या लोकांचा आणि निराधार दिव्यांगाचा समस्यांचा आपल्या जाहीरनाम्यातून देखील उल्लेख करीत नाही.याबद्दल महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती संघाचे तालुका सचिव संजय कडोळे यांनी खंत व्यक्त केली असून, भटक्या जमाती आणि वयोवृद्ध,दिव्यांग व निराधार मतदार देखील आपल्या स्वतंत्र भारताचे आणि महाराष्ट्र राज्याचे, आपल्या नगर पालिका किंवा ग्राम पंचायती अंतर्गत येणारे लोकशाहीतील नागरीक आहेत हे सत्य स्विकारून त्यांच्या विकासासाठी जागरूक राहून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी सुद्धा भटक्या विमुक्त समाजाचे जनसेवक संजय कडोळे यांनी सर्वच राजकिय पक्षांना या प्रसिद्धी पत्रकामधून केली आहे.