आरमोरी- “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा " निमित्त शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत "हर घर तिरंगा"अभियान आरमोरी तालुक्यात राबविण्यात येत आहे. सदर कालावधीत सरकारी कार्यालय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणीक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तसेच नागरीकांनी स्वतःच्या घरावर स्वंयस्फुतीने ध्वज संहीतेचे पालन करुन राष्ट्रध्वज लावावे . असे आवाहन तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले.
अभियान राबविण्याच्या संदर्भात तहसिल कार्यालय आरमोरी येथे शुक्रवार दिनांक २२ ला सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय आरमोरी येथील सभागृहात सभेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सदर सभेला मार्गदर्शक म्हणून आरमोरी न.प.च्या मुख्याधिकारी माधुरी सलामे,संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज,नायब तहसीलदार संजय राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डाँ.आनंद ठिकरे आदी उपस्थित होते.
आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आहे. आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल अशा प्रकारे कृत्य करू नये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या घराघरात हा ध्वज लावायचा आहे. त्यामुळे ही ध्वज संहिता पाळण्यात यावी, असे आवाहनही तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले आहे.
सदर सभेला सर्व पत्रकार बंधू, सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख , प्रतिष्ठित नागरिक ,युवारंगचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.