सावरगाव नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील बाजीराव कोहरे यांच्या शेतातील शेततळ्याजवळ गुरुवारी पट्टेदार वाघाचे निवांत निजलेल्या अवस्थेत दर्शन झाल्याने पुन्हा सावरगाववासीय नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी कोहरे यांच्या याच शेतात वाघाने गावातील एका महिलेला ठार केले होते.
तालुक्यातील जनतेला वाघाच्या दहशतीपासून अजूनही मुक्ती मिळालेली नाही. कुठे ना कुठे वाघाचे दर्शन तर कुठे मनुष्य, जनावरे यांची जीवितहानी सुरूच आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर फार मोठा परिणाम झालेला आहे. काही दिवस वाघाची दहशत थांबली जरी असली तरी पुन्हा अनेक गावांतील नागरिकांना वाघाचे झालीत. दर्शन व्हायला लागलेआहे.
सावरगाव येथील वृद्ध शेतकरी बाजीराव कोहरे यांच्या शेतात त्यांच्यासह काही शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन झाले. त्यांच्या शेतातील शेततळ्याच्या पाळीवर पट्टेदार वाघ निवांत निजलेला असताना शेतालगतच्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष बघितले असल्याची माहिती दिली. कोहरे यांच्या शेतात धान कापणी करीत असताना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये गावातीलच संगीता संजय खंडरे या विधवा महिलेला वाघाने ठार केले होते.