बुद्ध, बुद्ध पौर्णिमा ही बुद्धपौर्णिमा, गौतम बुद्धाला अभिवादनच करणे नव्हे तर बुद्धाला स्वीकारण्याचा, समजून घेण्याचा किंबहुना शरीरातील रूधीरकणात बुद्धाचे ज्ञान भरविण्याचा असा अनमोल क्षण होय. डॉ. आ. ह. साळुंखे सर एका कवितेत म्हणतात, "सूर्य होता आले नाही तर, सूर्यफूल व्हावे, मस्तक त्याच्याकडे असावे त्याच्या आलोकात पाहावे. बुद्ध होता आले नाही तर बुद्धफूल व्हावे, हृदय त्याच्याकडे असावे त्याच्या स्फूर्तीत जगावे."अशी हृदयाला स्पर्श करणारी, भेदून घेणारी, निस्सीम काव्यरचना बघता बुद्ध आपल्याला स्पर्शावा, त्यातून नव्या समृद्ध जाणिवा निर्माण व्हाव्यात. असं कुणास वाटू नये काय? इथल्या बहुजन समाजानं हे जाणून घ्यायलाच हवं. जगात असा महत्त्वाचा क्षण, सुदिन दुसरा कुठला असेल बरे! हे आपण समजून घ्यायलाच हवे.
भगवान गौतम बुद्ध
मानवाने नेहमीच सत्याच्या शोधात असले पाहिजे. नव्हे हे माणसाचे अंतिम ध्येयच असते. सत्याशिवाय दुसरं काहीही नसतं हे साऱ्यांनाच ठाऊकही आहे. परंतु या जगातील इतर पसारा त्याला त्याच्या सत्यापासून दूर सारतं आणि आपले पाऊल इथेच चुकतात. एक चारोळी बघा,
"रस्ता कुठेच संपत नाही, चालत असतो आपण,
रस्ता चुकला म्हणतो तरी चुकत असतो आपण."
आपली वाट अशीच चुकलेली. आपणच चुकलेले आहोत ही डोळस दृष्टी निर्माण करावयास लावणारा हा दिवस.
बुद्धाच्या जीवनातील मार्मिक सत्य स्वीकारण्याचा इथेच अल्पसा तरी प्रयत्न व्हायला हवा. असं मनोमन वाटतं. आमचे एक कविमित्र कवितेत म्हणतात. "हे सिद्धार्था, मनावर ताबा मिळवून तू खरेच बुद्ध जाहलास. हीच वेळ माझ्यावर येते तेव्हा… शरीरातील हृदय बाहेर काढून तीक्ष्ण काटयाच्या झुडूपावर टांगून ठेवावसं वाटतं." या काव्यातील गर्भितार्थ जर आपण उगाळू शकलो तर प्रत्येक मानवाची अवस्था ह्या कवीच्या अवस्थेसारखीच होईल. नव्हे व्हायलाच पाहिजे. तेव्हाच माणुसकीचं तत्त्वज्ञान सांगणारं हे जग, स्वतः स्वतःतील अंतर कापून स्वातंत्र्य, समता, बंधुतेच्या विश्वात सहज रममाण होईल. नाहीतर हे जीवन असेच दूरवर परागंदा होणारे.
इथला सूर्योदय इथल्या वर्णव्यवस्थेच्या छिणाल संस्कृतीत गाडल्या गेला आहे. इथे होणारी मनाची कत्तल ही कुणी थांबवावी काय? विषाच्या ओंजळीत गोंजारलेला असमानतेचा प्रत्येक थेंब, राष्ट्राभिमानाच्या प्रत्येक स्वादानं चाखताना, समानतेचा दीप चेतविणाऱ्या ह्या बुद्धास अर्पण करायला हवा… आपल्याच अस्तित्वाचे निखारे नाहक पेटवून आमच्याच मनमेंदूचे केलेले छिन्न विछिन्न तुकडे खरेतर आता आम्हीच मायेनं बोतरीले ठिगळ लावून शिवावं तसं शिवायला पाहिजेत. एका धम्म विचाराच्या धाग्याने. हा धागा मानवाच्या रक्ताच्या एकाच लाल रंगाचा आहे हेही ओळखता यायला हवा.
इथली वसाहत आता माणसाने माणसांनाच खावी अशी भयकंपित झालेली आहे. तेव्हा हे भय, ही दहशत मिटावी आणि मिळावा सर्वांना मुक्ततेचा श्वास. असं वाटत असेल तर बुद्धाशिवाय कुठलाही पर्याय ह्या जगात नाही. बुद्ध, धम्म, संघ अनुसरणाचा मार्ग म्हणजेच आपलं जीवन मुक्त, संपूर्ण जागृत करण्याचा क्षण असेल. एवढंच नव्हेतर जीवहिंसा, चोरी, अनाचार, खोटारडेपणा, तथा मोहसेवनापासून अलिप्ततावादी होऊन जीवनाला सुवर्णचकाकी देणारा क्षण असेल. राग, द्वेष, मोहाला दूर सारण्याचा क्षण असेल. असं आपल्याला जेव्हा जाणवेल तेव्हाच आपला सर्वश्रेष्ठ आधार बुद्ध आहे हे ठासून सांगता येईल.
परंतु एक ना एक दिवस इथल्या मानवाला ही बुद्धदिशा गवसेल आणि बेभान होऊन तो चालत येईल या वाटेवर हा आशावाद असायलाच हवा. इथल्या रंगमंचावर होणारं युद्ध, झुंज आपण डोक्याने समजून घ्यावी. इथल्या राज्यव्यवस्थेचा तह आपण लक्षात घ्यावा. तेव्हा आपल्या किती पिढ्या नेस्तनाबूत झाल्या हे आपल्या ध्यानात येईल आणि अंतरंगातून "बुद्धम् शरणम् गच्छामीं, धम्मम् शरणम् गच्छामीं, संघम् शरणम् गच्छामीं," चा सहजतेने उद्गार होईल.
आपला समाज सत्य लपवून उद्ध्वस्त होतोय. तेव्हा आता बुद्धाची शांती कायम राखावीच लागेल. बेचिराख झालेल्या जपानची जिद्द, तळमळ, संघर्ष, ध्यास, गुणवत्तेचा विचार व विकास पेरावाच लागेल. असेलही ज्याचा त्याचा प्रश्न.. कुठले नीतितत्त्व आणि कुठले धर्मविचार बाळगायचे ते? परंतु सध्या या जगाला बुद्धाशिवाय पर्याय कुठला बरे!
धर्माच्या नावाने हिंसेची शेती इथं पिकवल्या जात आहे आणि दररोज इथला माणूस त्याच्या मेंदूनेच विकल्या जात आहे. असो! शेवटी निर्णय आपलाच! काय म्हणून मरावे? काय म्हणून उरावे? केव्हा ना केव्हा सरावे, परंतु सगळेच सांगित असतात इथे, “गड्यांनो, फक्त बुद्ध होऊन जाहावे…!” शेवटी बुद्धाला अभिवादन करतानाच माझ्या मलाच चारोळी आठवतात.
अश्रू गाळून रडता तसे
पाऊस तुमच्यावर रडला होता.
आयुष्य सुखी जगताना
बुद्ध कुणास कळला होता?
आपल्या प्रतिक्रिया द्या....