स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व लायन्स क्लब अकोला मिड टाऊन गोल्ड च्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ग्रीनलँड कॉटेज अकोला येथे दिव्यांगांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले . यावेळी मंचावर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे ,कोषाध्यक्ष श्री.विजय कोरडे,डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन सुनील देसर्डा , चेयरपर्सन लायन मुरलीधर उपाध्याय ,अध्यक्ष लायन अनीता उपाध्याय, रीजन सचिव लायन विवेक गावंडे ,कोषाध्यक्ष रूपम बिसेन, सचिव मंगेश कक्कड़ उपस्थित होते . कार्यक्रमाच्या प्रारंभी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे अंध सदस्य मोहम्मद शोएब यांनी स्वागत गीत व होली गीत प्रस्तुत केले त्यानंतर संस्थेची बालकलावंत आराध्या हिवराळे द्वारा स्वागत नृत्याचे सादरीकरण करण्यात आले . त्यानंतर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व लायन्स क्लब अकोला मिड टाउन गोल्ड तर्फे शाळा महाविद्यालयात शिकत असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हाईट केन , ब्रेल बुक्स , शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले . यावेळी डॉ.विशाल कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने राबवण्यात येणाऱ्या सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. त्याचबरोबर आगामी काळात संस्थेतर्फे दिव्यांग वस्तीगृह , प्रशिक्षण केंद्र व पुनर्वसन केंद्राच्या निर्मितीसाठी लायन्स क्लब अकोला ने सहकार्य करावे असे आव्हान केले . २० अंध विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून लायन्स क्लब अकोलाच्या अंजू अलिमचांदनी , नितिन कुमार जोशी व आनंद राय या सदस्यांनी ब्रेल बुक्स व व्हाईट केन दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला कडे हस्तांतरित केल्या . अनिता उपाध्याय व लायन्स क्लब अकोला मिड टाउन गोल्ड च्या सामाजिक उपक्रमाचा सत्कार डॉ.विशाल कोरडे यांनी प्रमाणपत्र देऊन केला . श्री.सुनील देसर्डा व अनिता उपाध्याय यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोल्याच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात लायन्स क्लब अकोला आपले सहकार्य देईल असे आश्वासन देऊन संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य अस्मिता मिश्रा , स्वरूप तायडे , नीता वायकोळे ,अनामिका देशपांडे व रूपाली तायडे यांनी सहकार्य केले .