ज्या वनामध्ये वृक्षवेली, जंगलातील प्राणी तसेच पक्षी सुद्धा एका स्वरांत गाणे गातांना जणूकाही भगवंताची स्तुतीच करीत आहे असे वाटते. हे सर्व सगेसोयरे आनंदाने एकत्र नांदतात. संत तुकाराम महाराजांनी वृक्षाचे महत्त्व सांगताना अतिशय सुंदर अभंग मांडला आहे.
वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे ।
पक्षीही सुस्वरे आळविती ।।
वृक्ष खूप महत्वाची भूमिका बजावतात. आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी झाडे, वेली लावणे फार महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या एका अभंगातून फुलझाडे, वेली, वृक्ष याबद्दल आपले निसर्गावरील प्रेम व्यक्त करताना म्हणतात.
मोगरा फुलला, मोगरा फुलला ।
फुले वेचिता बहरु, कळियासी आला ।।
निसर्गातील मोगऱ्याचे वेलीला भरपूर कळ्या येऊन बहरु लागला. आज आनंदाने माझे मनाचा मोगरा फुलला आहे. मनातील आनंदाची मोगऱ्याची वेल फुलली आहे. जिकडे तिकडे मोगऱ्याचा सुगंध दरवळत आहे. फुले वेचावीत ती कधी संपतच नाहीत. मनाच्या आनंदाला पारावार नाही. पुढे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
इवलेसे रोप लावियेले व्दारी ।
त्याचा वेलु गेला गगनावरी ।।
परमार्थाच्या दारी लावलेले लहानसे रोप, त्याचा वेल गगनापलीकडे वाढत गेला तसेच मनाचा वेल सुद्धा असाच फुलत राहिला पाहिजे. निसर्गातील वृक्ष, वेलीवर संत ज्ञानेश्वरांनी प्रेम केले. ते म्हणतात की, आपल्या मनाचा मोगरा फुलणे ही भाग्याची गोष्ट आहे. संत सावता महाराज आपल्या अभंगात शेत बागाईत लावू असे सांगतात.
आमची माळियाची जात ।
शेत लावू बागाईत ।
कांदा, मुळा, भाजी ।
अवघी विठाबाई माझी ।।
संत सावता महाराज यांनी शेतातील झाडे, रोपे यालाच ईश्वर मानले. कधी पंढरपूरचे विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाही. ते बगीच्यातील रोपे यांनाच देव मानू लागले व आपले कर्तव्य पार पाडू लागले. त्यांचे प्रेम बगीच्यातील झाडांवर दिसून येते.
वृक्षसंवर्धन काळाची गरजः-
आपण जर वृक्षरोपण केले, वृक्षांचे योग्य पालनपोषण केले तर त्यांच्यापासून आपल्याला विविध गोष्टी प्राप्त होतात. ज्या भागात वृक्षांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, त्या भागातील परिसर हा स्वच्छ आणि निसर्गमय पाहायला मिळतो. आपल्या आजूबाजूला असलेली झाडे ही अन्न,वस्त्र, निवारा देतातच पण झाडाची फुले, फळे, पाने, साल यापासून आयुर्वेदीक औषधी बनवून रोगावर उपचार म्हणून वापरतात.
तसेच पर्यावरणातील काही झाडांपासून रबर आणि विविध प्रकारचे इंधन सुद्धा प्राप्त होते. अनेक पक्षी या झाडाच्या आधारेच आपले घर बांधतात व विसावा घेतात. यामुळे निसर्ग सुंदर होऊन जातो. वृक्षाचा मानवाला सर्वात मोठा फायदा म्हणजे आॕक्सिजन मिळते तसेच आपल्या वातावरणातील हवा शुद्ध करण्यासाठी आणि पर्यावरणात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वृक्ष महत्वाची भूमिका आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या खूप साऱ्या अडचणी आणि समस्या दूर करण्यास फायदा होतो. वृक्ष हे पर्यावरणाचे संतुलन नीट करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.
वातावरणात असलेला कार्बनडाॕय आॕक्साईड वायू सोसून घेतात व मानवाला जीवनाला लागणारा आॕक्सीजन वायू बाहेर सोडतात, त्यामुळेच आज पृथ्वीवर सजीव सृष्टी टिकून आहे. जमिनीची धूप ही देखील खूप मोठी समस्या आहे. ही समस्या रोखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. अलिकडे दिवसेंदिवस माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मोठमोठे उद्योगधंदे उभारण्यासाठी, वाहतुकीकरिता मोठमोठी रस्ते करण्यासाठी वृक्षांची मोठी तोड करीत आहेत. त्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होऊन जागतिक तापमान वाढ असे परिणाम दिसून येत आहे. प्रदूषण वाढल्यामुळे श्वसणाचे आणि हृदयाचे आजार उद्भवतात. तापमानामुळे त्वचेचे रोग, कर्करोग यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
झाडे लावा, झाडे जगवा !
आज अशी परिस्थिती उद्भवत आहे की, तापमान ४५ वर गेले आहे. पुढील पाच वर्षात तापमान ५० चे वर जाण्याची भिती आहे, म्हणून प्रत्येक घरात जेवढे व्यक्ती असेल त्यांनी एक एक झाडे लावण्याचा उपक्रम राबविला पाहिजे. झाड लावल्यानंतर ते झाड जगण्यासाठी त्याला पाणी दिले पाहिजे. झाडे कोणती लावावी. पिंपळाचे झाड सर्वात जास्त आॕक्सीजन देते. १०० ते १५० वर्षे टिकणारे झाडे लावावी. उंबराचे झाड, पिंपळाचे झाड, निंबाचे झाड, वडाचे झाडे लावावीत. त्यासोबतच लहान झाडे सुद्धा लावावीत. आपल्या देशात प्राचीन काळापासून वृक्ष पूजा होत आली आहे. आपण वड, पिंपळ, उंबराची पूजा करतो, या झाडांना धार्मिक पुराणामध्ये जोडल्या गेले आहे. आपण या मागचा हेतू विसरत आहोत.
माणूस आॕक्सीजन किती घेतो--
माणसाला आॕक्सीजन निसर्गातील झाडांपासून मिळते. एका दिवसात सामान्यतः माणूस ३ सिलिंडर भरतील इतका प्राणवायूचे (आॕक्सीजन) श्वसन करतो. एका आॕक्सीजन सिलिंडरची सरासरी किंमत ७०० रुपये आहे. म्हणजे एक दिवसाला एक माणूस २१०० रुपयाचा प्राणवायू वापरतो. सर्व वर्षाचा हिशोब करता ही किंमत ७,६६,५०० रुपये इतकी येते. सरासरी आपले आयुष्य ६५ धरले तर हीच किंमत साधारणपणे ५ कोटी रुपये इतकी येते. हा प्राणवायू आपल्याला आजूबाजूचे झाडांपासून मोफत मिळत असतो. आपण कधीही निसर्गाचे विरुद्ध जावू नये. निसर्ग आपला चमत्कार दाखवून देत असतो. शासन वृक्षरोपण राबवितात पण त्यातील किती झाडे जगतात, याकडे कुणाचे लक्ष नाही. वृक्षरोपण केल्यानंतर त्याला दोन वर्षे पाणी देण्याची आवश्यकता असते. ते झाड दोन वर्षाचे झाले की जगते.
ओझोनच्या थरात घट--
सध्या ओझोनच्या थरात घट होत असल्यामुळे, झाडाची कत्तल होत असल्यामुळे या वायूमुळे हानिकारक वैश्विक किरण (मुख्यत्वे अल्ट्राव्हायोलेट किरण) थोपविले जात असल्यामुळे ते जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. या ओझोनच्या थराची जाडी कमी झाली तर हे किरण पृथ्वीच्या पृष्ठ भागावर येण्याचे प्रमाण वाढेल व त्यामुळे सजीव सृष्टीस धोका पोहोचेल अशी शास्त्रज्ञांना भिती वाटत आहे. त्यामुळे तापमानचे प्रमाण वाढले आहे. पृथ्वीच सुरक्षा कवच म्हणजे ओझोनचा थर आहे. आज दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. कचरा, प्लॅस्टिक मातीत, पाण्यात आणि हवेत मिसळत आहे.
झाड हे आॕक्सीजन सोबत पाणी देते--
निसर्गाचा अविश्वसणीय आविष्कार आहे की, झाड हे आॕक्सीजन बरोबरच पाणीही देते. ही दिल्ली नवराष्ट्र न्यूज वरील बातमी आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्वच गोष्टी समजून घेणे मानवासाठी थोडे कठीणच आहे. आॕक्सीजन देणारे झाड तुम्ही नेहमी ऐकले आणि पाहिले असेल. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायलर झाला आहे. हे झाड केवळ आॕक्सीजनच देत नसून तहानलेल्यांची तहान देखील भागवत आहे. झाड आॕक्सीजन सोबतच पाणी देतांना दिसत आहे. झाडाची साल कापल्या बरोबर झाडातून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहू लागतो.
झाडाचे खोडामध्ये भरपूर पाणी असत. एक व्यक्ती झाडाची साल कापून काढताच तेथून पाण्याचा प्रवाह वाहू लागतो. पाणी इतके स्वच्छ आहे की, तो ते पिण्यास सुरुवात करतो. या झाडाचे नाव टर्मिनलिया टोनोन्टोसा आहे. ज्याला सामान्यतः क्रोकोडाइल बार्क ट्री असेही म्हणतात. हे झाड भारताच्या काही भागात आढळते. विशेष म्हणजे या झाडाच्या खोडामध्ये भरपूर पाणी भरलेले असते. जे शुद्ध आणि पिण्यास योग्य आहे. या झाडाला खूप महत्त्व आहे. या वृक्षाला काही लोक बोधीवृक्ष असेही म्हणतात.
या लेखातून एवढेच घ्यायचे की, प्रत्येक व्यक्तीने एक एक झाड लावून जगवावे. "झाडे लावा, झाडे जगवा"
लेखक-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....