वाशिम : आजच्या जगात आपल्या सभोवताली चोहीकडचा माणूस हा संधीसाधू झालेला आहे.त्याला मिळेल त्या मार्गाने केवळ दामदुपट्टीने पैसा मिळविण्याची लालसा लागलेली आहे.पैसा मिळविण्यासाठी तो नातीगोती दाखवितो.मित्रमंडळी जमवितो.राजकारणाच्या आखाड्यात उतरून केवळ निवडणूक होईस्तोवर मतदाराला दारू,मटण,चिरी मिरी वाटून निवडणूक जिंकतो.आणि एकदा का निवडणूक जिंकली की मग पदावर असेपर्यंत,खोऱ्याने मिळेल तेवढा पैसा गोळा करतो. जास्तित जास्त पैसा मिळविण्यासाठी स्वतःच्या संस्था,पतसंस्था,बँका, शाळा,महाविद्यालये काढतो. जास्तित जास्त महागड्या गाड्या खरेदी करतो.मतदारा पासून आणि आयकर विभागापासून आपला पैसा लपविण्याकरीता पुण्या मुंबईत दिल्लीत शेती,फॉर्म हाऊस,प्लॉटस् आपल्या कानाखालच्या भाऊबंद किंवा सोयऱ्याच्या नावाने खरेदी करतो. परंतु तरीही त्याची लालसा ही संपतच नाही.ही सर्व कमाई हा स्वार्थी मनुष्य तळागाळातील गोरगरीब लोकांच्या मुंड्या मोडून त्यांचा विश्वासघात करून,त्यांचे मन दुखवून आणि त्यांचे श्राप घेऊन करत असतो.त्याने केलेले हे पाप प्रत्यक्ष परमेश्वर पहात असतो.आणि अखेर त्याच्या पापाचा घडा एकदाचा भरला की मग एक दिवस त्याचेवर एन्टी करप्शन,सिबीआय किंवा ईडी ची धाड पडते व गोरगरीबाची मनं दुखवून आणि त्यांची श्राप घेऊन कमवलेली संपदा सरकार जमा होते.किंवा त्याच्या कुटुंबाचा अकाली अंत होऊन, वाम मार्गाने मिळविलेले सर्व वैभव वाया व्यर्थ जाते,संपत्तीला उत्तराधिकारी देखील रहात नाही.शेवटी वारस ऊरला नसल्याने ही संपदा तिसऱ्याच सोयऱ्याला आपसुख मिळते.किंवा सरकार कडून जप्त केली जाते.आपण जर अवलोकन केले तर आज आपल्या देशात राज्यात गावोगावी अनेकांचे राजवाडे,महाल,वाडे,इमारती उध्वस्त होऊन त्याचे भग्नखंडार ओस पडलेले दिसून येतात.गोरगरीबांचा श्राप घेऊन कमविलेल्या संपदेचा हा परिणाम असतो.मनुष्य जीवन हे अल्पायुषी असते.येथे कोणीही अमर नाही.त्यामुळे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे माणुसकीनेच वागलं पाहिजे. परंतु दुदैवाने आज समाजातील प्रत्येक माणूस स्व:स्वार्थाने वागत आहे.केवळ स्वतःसाठी जगत आहे आणि स्वतःच्या चुकांनी स्वतःचा अंत ओढवून घेत आहे. स्वतःच स्वतःचा आत्मघात करीत आहे.या समाजात त्याला केवळ स्वतःच्या जीवावर जगताच येत नसते.जीवन जगतांना त्याला तहहयात दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते.त्याकरीता वेळोवेळी त्याला सभोवतालच्या लोकांची गरज असते.परंतु आजच माणूस त्याचे इप्सित पूर्ण झाले की, आपल्या उपकार कर्त्याला विसरून जातो.आणि स्वतःचे काम भागवून घेताच "गरज सरो वैद्य मरो." ह्या म्हणीप्रमाणे स्व:स्वार्थ साधवून घेऊन उपकार कर्त्याला वाऱ्यावर सोडतो.हे कटूसत्य असून अशा वृत्तीमुळे अखेर स्वार्थीजनांचा अंत वाईट होतो.ही वस्तूस्थिती आहे.त्यामुळे माणसाने केवळ स्वतःसाठी न जगता,आपल्या जीवाचा,आपल्या पूर्वजांचा, आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी जगले पाहिजे.आणि मृत्युनंतरही आपला नावलौकिक वाढविण्यासाठी माणसाने मानवतेचे व्रत घेऊन व्रतस्थ राहीले पाहिजे.सभोवतालच्या गरजूंना त्याला हवी ती मदत करून दान केले पाहिजे.व शाश्वत असणारे पुण्य मिळवीले पाहिजे.असे मार्गदर्शन आपल्या आख्यानातून जय भवानी जय मल्हार गोंधळी कला संचाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.