वाशिम/अकोला/अमरावती : गेल्या आठवड्याच्या दि. 18 ऑक्टोंबर पासून परतीच्या पावसाचे थैमान सुरु असून भाग बदलवीत पाऊस होतो आहे. शिवाय ढगांच्या गडगडाटात काही ठिकाणी विजा कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत.त्यामुळे जगाचा पोशिंदा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी राजा संकटाशी दोन हात करीत आहे. बऱ्याच भागात शेतकरी राजाच्या सोयाबीन पिकाचे,कपाशी पिकाचे नुकसान होत आहे. अशातच सध्या एकीकडे विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजला आहे तर दुसरीकडे दिपावली सणासुदीचे दिवस उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. तसेच शेतकरी राजाच्या सोयाबीन पिकाला भाव नाही तर जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने दरदिवशी महागाई फुगतच चालली आहे.मात्र आचारसंहितेच्या धसक्याने राजकिय पुढारी शेतकरी राजाच्या बांधावर जायला किंवा कोणतीही मदत करायला तयार नाही तर शासकिय यंत्रणेतील अधिकारी मात्र निवडणूक कामातच व्यस्त झाले असल्याने संकटातील शेतकरी राजाचे अश्रू पुसायला कुणीही तयार दिसत नाही. तसेच राज्याच्या हवामान विभागाकडून ऑक्टोंबर अखेर पर्यंत परतीच्या पावसाचे काही भागात वादळवारे व गारपिटीसह पाऊस होण्याचे अनुमान देण्यात आल्यामुळे, शेतकरी विवंचनेत सापडला आहे.त्यामुळे दिपावली कशी करावी ? दिपावलीचा किराणा कसा भरायचा ? आपल्या चिमुकल्या पाखरांना कपडालत्ता कसा घ्यावा ? पैसे आणावे तरी कोणत्या सावकाराकडून ? असे नानाविध प्रश्न सर्वसामान्य ग्रामस्थ शेतकऱ्यांना पडले असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.