कारंजा (लाड) : कारंजा तालुक्यातील ग्राम दोनजच्या, शेतकरी कन्या प्रिया राऊत हिला नुकतेच मुंबई येथे झालेल्या भव्य समारंभात महाराष्ट्र समाजसेवा पुरस्काराने गौरविण्यात आल्याने, दोनजच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेल्याचे बोलले जात असून त्याबद्दल ग्रामस्थ शेतकऱ्या मध्ये आनंदाला उधाण आले असून,शेतकरी कन्या प्रिया राऊत हीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतेच सुप्रसिद्ध हिन्दी चित्रपट लेखक गायक तथा संगीतकार घनश्याम वासवानी यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्र समाजसेवा या प्रतिष्ठाच्या पुरस्काराने,प्रिया राऊत हिला नॅशनल एज्युकेशन ॲन्ड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझर मुंबई या राष्ट्रिय संस्थेकडून गौरविण्यात आले आहे.या सांस्कृतिक कार्यक्रमात देशभरातील विविध मान्यवरांना देखील पुरस्कारीत करण्यात आले. दरवर्षी देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची या पुरस्कारा करीता निवड करण्यात येते. गेल्या शनिवार दि. 25 मे 2024 रोजी हॉटेल कोहिनूर काँटिनेटल या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये मुंबई येथे हा पुरस्कार समारंभ संपन्न झाला, या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अनेक हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील विभूतीसह उद्योगपती शिक्षण तज्ञाची उपस्थिती होती. यापूर्वी हा पुरस्कार नामांकित दिग्गज अमिताभ बच्चन, विजय पाटकर,रणजीत, पूर्वाश्रमीचे कारंजा लाड येथील व सध्या दुबई वरून व्यापार करणारे मसाला किंग धनंजय दातार, अभिनेत्री सुश्मिता सेन, जयश्री टी,आसावरी जोशी, सोनाली कुलकणी यांना मिळाला आहे. यावर्षी कारंजा तालुक्यातील रहिवाशी आणि सामान्य कुटुंबातील शेतकरी कन्येला प्रिया राऊत हिला तिच्या कलागुणांकरीता हा पुरस्कार मिळाला.ही आमच्या तालुक्या करीता निश्चितच भूषणावह बाब असल्याचे ,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी म्हटले असून तीचे अभिनंदन केले आहे.