अकोल्यामधील पारसगावातील मंदिराच्या शेडवर झाड कोसळून सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 37 जण जखमी झाले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.
तसेच महत्त्वाचे आदेशदेखील दिले आहेत
पारस (जि.अकोला) येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. पारसची घटना अतिशय दुर्दैवी आणि गंभीर आहे. त्या ठिकाणी शेडवर झाड कोसळले आणि ते शेड कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये 37 जण जखमी झाले आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि जखमींना चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावे अशा सूचना दिल्या आहेत.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारच्या वतीने केला जाईल. तर मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येईल. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्या सर्व संवेदना या परिवाराच्या सोबत आहे.असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.