वाशिम : जिल्हयातील सोयाबीन पिकाची कापणी अंतिम टप्प्यात आहे.सलग सोयाबीन, मुग, उडीद पिकाचे क्षेत्र कापणी झाल्यानंतर शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीचे नियोजन करतात.त्या दृष्टीने हिवाळी पिकाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांची वाटचाल सुरू झाली असून तयारी सुम आहे.यामध्ये मुख्यतः हरभरा या रब्बी पिकास शेतकरी मोठया प्रमाणावर पसंती देतात.पंरतू हरभऱ्याचे उत्पादन आणि बाजारातील दर याचा विचार करता हरभरापेक्षा करडई,मोहरी,जवस यासारखे कमी पाण्यावर येणारे व कमी मशागतीच्या पिकाची लागवड केल्यास हरभरा पिकापेक्षा निश्चीतच जास्त फायदा मिळेल.
खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी ८५ टक्के पाऊस झाल्यामुळे जमीनीत कमी प्रमाणात ओल असल्यामुळे उपलब्ध ओलिवर तात्काळ रब्बी पिकाची पेरणी करावी. केंद्र शासनाने जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ हे वर्ष आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषीत केले आहे.
तृणधान्याचे आहारातील अनन्य साधारण महत्व लक्षात घेता रब्बी हंगामात ज्वारी या पिकाची पेरणी करावी.हरभरा व गहु ही पारंपारीक रब्बी पिके घेण्यापेक्षा करडई, जवस, रब्बी तिळ, मोहरी यासारखी तेलवर्गीय पिके घेण्याचे नियोजन करावे. जेणेकरुन पिकाची फेरपालट होऊन अधिक आर्थिक नफा मिळण्यास मदत होईल.रब्बी पिके पेरणी करण्यापुर्वी बियाण्यास रासायनिक व जिवाणू संवर्धनाची बिजप्रक्रिया करावी. याकरीता पुढीललप्रमाणे पिकनिहाय औषधे वापरावे. करडई - अॅझोटोबॅक्टर व पीएसबी जिवाणू संवर्धन २०० ग्रॅम + ट्रायकोडर्मा ४० ग्रॅम, १० किलो बियाणे,रब्बी ज्वारी- अॅझोटोबॅक्टजर व पीएसबी जिवाणु संवर्धन २०० ग्रॅम + ट्रायकोडर्मा ४० ग्रॅम / १० किलो बियाणे, जवस - कार्बनडायझीम २ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम/ किलो बियाण्यास लावल्यानंतर तीन तासांनी अॅझोटोबॅक्टर २० ग्रॅम + पीएसबी २० ग्रॅम / किलो बियाण्यास लावावे. मोहरी - पेरणीपुर्वी थायरम ३ ग्रॅम / किलो बियाणे. गहू-थायरम किंवा व्हिटावॅक्सर ७५ टक्के पाण्यात विरघळणारी बुकटी २.५ ग्रॅम/ किलो बियाण्यामस लावल्यानंतर अॅझोटोबॅक्टणर २० ग्रॅम + पीएसबी २० ग्रॅम / किलो बियाण्याणस लावावे. हरभरा- कार्बोक्झील ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के (व्हिटावॅक्सि) ३ ग्रॅम / किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा ६ मीली/किलो बियाण्यास लावल्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम + २५ ग्रॅम पीएसबी किंवा रायझोबियम ६ मीली + पीएसबी ६ मीली / किलो बियाण्यास लावावे. शेतकऱ्यांनी शक्यतो याप्रमाणे औषधे व जिवाणू संवर्धनाचा बिजप्रक्रियाकरीता वापर करुनच पेरणी करावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी केले आहे.