कुरखेडा, : गेवर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेजवळील रस्त्यावर आज बुधवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन एका चालकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
चरणदास गोमा उसेंडी (५८, रा. भगवानपूर) असे मृताचे नाव असून ते एमएच ३३ डी ९३०१ क्रमांकाच्या दुचाकीने गेवर्धाकडे येत होते तर प्रीतम ईश्वर नैताम (१८, रा. कोसी) व जनाबाई नैताम (६९, रा. रावणवाडी) हे एमएच ३४ क्यू २०१९ क्रमांकाच्या दुचाकीवरून अरततोंडीकडे जात असताना समोरासमोर धडक झाली.
या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चरणदास उसेंडी यांचा मृत्यू झाला. तर प्रीतम नैताम व जनाबाई नैताम यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास कुरखेडा पोलिस करत आहेत.