कारंजा लाड -- वाशिम,कारंजा व मानोरा बसस्थानकातून अंजनगाव सुर्जी ,परतवाडा व प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मुक्तागिरी येथे जाण्याकरीता आज रोजी कोणत्याही प्रकारची एस टी महामंडळाची थेट बससेवा उपलब्ध नाही.त्यामुळे जैन समुदायाच्या भाविकांना तिर्थक्षेत्र मुक्तागीरीला जाण्यास अडचण होते.वाशिम जिल्ह्यात शिरपूर जैन, कारंजा (लाड) आणि अमरावती जिल्ह्यात मुक्तागीरी, भातकुली, अशी सुप्रसिद्ध जैन तिर्थक्षेत्र आहेत. शिवाय परतवाडा तालुक्यात मुक्तागीरी चिखलदराम् अशी पर्यटन स्थळे असून वाशिम जिल्ह्यातून परतवाडा येथे व परतवाडा येथून कारंजा वाशिम येणाऱ्या जैन समुदायांच्या प्रवाशांची संख्या पुष्कळ मोठी आहे. शिवाय अन्य धर्मिय प्रवाशी देखील वाशिम परतवाडा प्रवास करीत असतात. तेव्हा ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाशिम कारंजा मानोरा आगारातून परतवाडा वा मुक्तागिरी करीता एस टी बस ची थेट सेवा सुरु करावी अशी मागणी एका निवेदनाव्दारे दि जैन महासमितीचे कारंजा (लाड) संभागचे अध्यक्ष ॲड संदेश जिंतुरकर यांनी शिवसेना नेत्या (शिंदे गट )व आमदार भावनाताई गवळी यांना केली आहे.
पुढे निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की मागील दहा बारा वर्षापूर्वी वाशिम परतवाडा ही एस टी ची थेट बस सेवा सुरू होती.पण नंतर ती बस सेवा बंद पडली.आज रोजी वाशिम , कारंजा व मानोरा येथील नागरिकांना अंजनगाव सुर्जी, परतवाडा व जैन तीर्थक्षेत्र मुक्तागिरी या ठिकाणी जायचे असेल तर तुटत तुटतच प्रवास करावा लागतो.पावसाळ्यात तर हा प्रवास अधिकच कंटाळवाणा होऊन जातो.गाड्या वेळेवर न आल्यास गाड्याची वाट पाहण्यात पूर्ण दिवस जातो. शिवाय लहान मुले व वयोवृद्ध सोबत असतील तर परिस्थिती अत्यंत बिकट होते.महिला मंडळी तर एकट्या असतांना असा तुटत प्रवास करु शकत नाही.
पुढे जिंतुरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, वाशिम ,कारंजा व मानोरा येथुन परतवाडा जायचे असल्यास मूर्तीजापूर दर्यापुर या मार्गानेच जावे लागते .अथवा अमरावती मार्ग परतवाडा व मुक्तागिरी ला जावे लागते मात्र हा लांबचा पल्ला असल्यामुळे वाशिम व कारंजातील नागरिक सहसा मूर्तीजापूर दर्यापुर मार्गेच प्रवास करणे पसंत करतात.शिवाय भाडे ही कमी लागते, त्यामुळे नागरिकांची ही गैरसोय व अडचण लक्षात घेता राज्य सरकार ने वाशिम, मंगरूळपीर, कारंजा लाड येथून मूर्तीजापूर दर्यापुर,अंजनगाव मार्गे परतवाडा किंवा मुक्तागिरीसाठी एस टी ची थेट बस सेवा सुरू करावी अशी विनंती दि जैन महासमिती ने आमदार भावनाताई गवळी यांना केली आहे .
आमदार भावनाताई गवळी यांना निवेदन सादर करते वेळी दि जैन महासमितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य आशुतोष जोहरापुरकर, कारंजा लाड संभागचे अध्यक्ष ॲड संदेश जिंतुरकर,सचिव कविश गहाणकरी, कार्याध्यक्ष राजेंद्र खंडारे, नितीन बुरसे सर, उपाध्यक्ष गिरीश मिश्रीकोटकर उपस्थित होते .