जाफराबाद: जाफराबाद तालुक्यात रविवारी (ता.२६) रात्री आलेला वादळी वारा, जोरदार पावसाने खरीपातील पिके तसेच भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तसेच हा पाऊस रब्बी पिकांसाठी दिलासा देणारा मानल्या जात आहे. जाफराबाद तालुक्यात रविवारी रात्री विजांच्या कडकडासह वादळी पावसाने धुमाकूळ घातला. सोमवारी (ता.२७) सुध्दा अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. हवामान खात्याने या भागात २६ ते २८ नोव्हेंबर या काळात पाऊस, गारपिटीचा इशारा आधीच दिला होता. रविवारी दुपारपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी पाऊस आला. रात्री १० नंतर बहुतांश भागात पावसाने जोर धरला. विजांचा मोठा कडकडाट झाला. शिवाय वादळही घोंघावले. यामुळे टोमॅटो, मिरची, वेलवर्गीय फळभाज्यांचे नुकसान झाले. काही भागात वादळामुळे ही पिके जमिनदोस्त झाली.
सध्या खरीपातील कपाशी, तसेच तुरीचे पीक उभे आहे. वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतांमध्ये कपाशीच्या झाडांवर कापूस होता. हा कापूस पावसाने ओला झाला. कापूस आता लोंबकळला आहे. ओला झाल्याने हा कापूस आता पिवळा पडून दर्जा खालावण्याची चिंता आहे.कपाशीच्या पिकात पाणी साचले.
त्याचप्रमाणे रब्बीसाठी फायदेशीर रविवारी रात्री झालेला पाऊस प्रामुख्याने रब्बीसाठी फायदेशीर ठरणार आहे. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी लागवड रखडत चालली होती. सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात पेरणी सुरू होती. ज्यांनी थोड्या ओलीच्या आधारे पेरणी केली अशा शेतातील उगवण झालेल्या हरभऱ्याला हा पाऊस नवसंजीवनी देणारा ठरेल. सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने रखडलेल्या रब्बी पेरण्यासुद्धा आता वेग घेतली. काही प्रमाणात कोरडवाहू कपाशी पिकाला ही याचा फायदा होईल.