ब्रम्हपुरी
ब्रह्मपुरी आगाराच्या ब्रह्मपुरी-आरमोरी-रांगी-धानोरा या मार्गाने जाणाऱ्या एस. टी. बसच्या फेऱ्या एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपकाळापासून म्हणजे गेल्या ६-७ महिन्यांपासून बंद करण्यात आल्या आहेत. इतक्या महिन्यांचा कालखंड उलटूनही बसची सेवा सुरू करण्यात न आल्याने आरमोरी, रांगी, ब्रह्मपुरी व धानोरा परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा करुनही याकडे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्रास दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांना कमालीचा मनस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गाने एसटी बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हा प्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या नेतृत्त्वात राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या मार्फत निवेदन प्रेषित केले.
ब्रह्मपुरी, वैरागड, रांगी, धानोरा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी गेल्या आठ महिन्यांपासून ब्रह्मपुरी आगाराची एसटी बस सेवा बंद होती. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ही बस ब्रह्मपुरी येथून सकाळी 8.30 वाजता सुटत होती. दिवसभराच्या आपल्या नियमित दोन फेऱ्या करून सायंकाळी ब्रह्मपुरी आगारात पोहोचत होती. या बसमुळे आरमोरी, ब्रह्मपुरी, वैरागड, रांगी, धानोरा येथील नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी, रुग्ण आदींना धानोरा, आरमोरी, ब्रह्मपुरी या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी जाण्या-येण्याकरिता अत्यंत सोयीचे झाले होते. त्यामुळे सदर बसला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता. नागरिक एसटी बसने प्रवास करीत होते. ब्रह्मपुरी, आरमोरी, वैरागड, रांगी, धानोरा हा राज्यमार्ग असूनदेखील या मार्गावर अनेक खेडेगाव आहेत. राज्य मार्गाचे बांधकाम देखील पूर्ण झालेले आहे. सदर मार्गावर ब्रह्मपुरी-रांगी- धानोरा एसटी बस सुरू नसल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ब्रम्हपुरी, रांगी, धानोरा परिसरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्वरित बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हा प्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे.
निवेदन देते वेळी ब्रह्मपुरी उपतालुका प्रमुख डॉ. रामेश्वर राखडे, रमाकांत अर्गेलवार, माजी शहरप्रमुख शामराव भानारकर, ब्रह्मपुरी उपतालुका प्रमुख केवळराम पारधी, गणेश बागडे, विभाग प्रमुख मोरेश्वर अलोने, रामचंद्र मैंद, राजेश दुपारे व गुलाब बागडे आदी. शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....