कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : भारतिय शास्त्रज्ञांनी पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावर चांद्रयान -3 द्वारे,बुधवारी दि 23 ऑगष्ट 2023 रोजी सायंकाळी 6 : 04 च्या सुमारास अंतराळातील विक्रम लॅन्डर द्वारे यशस्वी पाऊल ठेवून,अख्ख्या जगाचे लक्ष्य लागलेली चांद्रयान मोहिम यशस्वी करीत भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा चंद्रावर फडकविण्याचा बहुमान मिळवून विश्वगुरु होण्याचे लक्ष्य साध्य केले व विज्ञान व संशोधन क्षेत्रात भारताचा नावलौकिक सुवर्णाक्षरात लिहील्या गेला आहे. अंतराळातील ही ऐतिहासिक घटना आपल्या विद्यार्थ्यांना दाखविण्याकरीता कारंजा येथील प्रत्येक कॉन्व्हेन्ट,शाळा महाविद्यालयानी अगोदरच तयारी करून,विद्यार्थ्यांना चांद्रयान मोहिम 'याची देही याची डोळा" दाखविण्याची व्यवस्था केलेली होती.शिवाय कारंजा येथील महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेने विशेष जनजागृती केली होती. त्यासोबत राष्ट्रीय आणि अनेक खाजगी दूरदर्शन वाहिन्या आणि सर्वच वृत्तपत्रानी प्रसिद्धीची मोहिम उघडलेली होती याप्रसंगी प्रत्येक घरोघरी नागरीक दुपारपासूनच दूरदर्शनच्या पडद्या समोर, चांद्रयान मोहिमेचा आनंद घेत होते. त्यामुळे बुधवारी सायंकाळच्या सुमारास तर अक्षरशः कारंजा शहरात संचार बंदी लागल्या प्रमाणे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत होते.आणि चंद्रावर चांद्रयान विक्रम लँडरचे यशस्वी पाऊल पडताच सर्व नागरीकांनी आनंद व्यक्त करून ठिकठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी, भारत माता की जय ! वंदे मातरमचा जयघोष केल्याचे व एकमेकांना शुभेच्छा दिल्याचे, प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.