अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत .दिव्यांग जनजागृतीपर विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात दिव्यांगांप्रती आदराचे स्थान निर्माण करण्याचे महान कार्य संस्थेतर्फे निरंतर केले जात आहे .याचाच एक भाग म्हणून *दि.12 नोव्हेंबर २०२२ रोजी इंद्रप्रस्थ हॉटेल येथे एक सामाजिक वाढदिवस साजरा करण्यात आला* .प्रा.विशाल कोरडे व श्री.गजानन अवस्थी यांच्या संकल्पनेतून असाच एक विशेष कार्यक्रम अकोल्यात पार पडला.90 वर्षाचे जेष्ठ समाजसेवक श्री.राजेंद्र प्रसाद अवस्थी यांचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे स्वरधारा हा दिव्यांग जनजागृतीपर संगीतमय कार्यक्रम अकोल्यातील मान्यवरांची दाद मिळवून गेला .फिल्मी ,सुगम ,भक्ती गीत व गझल अशा संगीतमय मेजवानी बरोबरच ब्रेल लिपीच्या प्रचार प्रसारासाठी विशेष व्याख्यान या कार्यक्रमात प्रा.विशाल कोरडे यांनी आयोजित केले होते .पांढरी काठीचे महत्त्व , ब्रेल पुस्तकांच्या निर्मितीसाठी समाजात जनजागृती करणे व दिव्यांगांना समाजात महत्त्वाचे स्थान देणे या उद्देशाने हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरला .श्री.राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी डॉक्युमेंटरी फिल्म व चार पिढ्यांचे एकत्रित संमेलन या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले .स्वरधारा या संगीतमय कार्यक्रमात दिव्यांग कलावंत यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले .कार्यक्रमात प्रा.विशाल कोरडे अनामिका देशपांडे ,कीर्ती मिश्रा ,नितीन खंडारे ,स्वाती मेश्राम ,मंगला निंबाळकर ,नागेश उपरवट,मनोहरराव काळे व प्राजक्ता वानखडे यांच्या सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .आयोजन समितीतर्फे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चा दिव्यांग शिक्षणासाठी आर्थिक मदत या कार्यक्रमात करण्यात आली .दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या सामाजिक उपक्रमाला समाज बांधवांनी सहकार्य करावे व अशा कार्यक्रमाचे निरंतर आयोजन करण्याचे आव्हान श्री अमित अवस्थी व अंकित अवस्थी यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अवस्थी परिवार व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले .या सामाजिक वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .