कारंजा : प्रत्येक ठिकाणी महसूल विभाग काम करतो. जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीच्या काळात महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून कामे करतात. संपूर्ण जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले.महसुल विभाग शासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक नागरिकांचा महसूल विभागाशी संबंध येतो. त्यामुळे नागरीकांची कामे करतांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरीकांशी मितभाषी राहून त्यांना सौजन्याची वागणूक देवून त्यांची कामे वेळेत पूर्ण करावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.
आज १ ऑगस्ट रोजी महसूल दिन पंधरवडा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, कारंजाचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब दराडे, वाशिमचे तहसीलदार निलेश पळसकर,कारंजाचे तहसीलदार कुणाल झाल्टे, यांची उपस्थिती होती. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये कारंजाचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे, नायब तहसीलदार रवी राठोड, लघुलेखक वैभव कुलकर्णी, अव्वल कारकून संतोष वंजारे, महसुल सहाय्यक वैभव केंद्रे, तलाठी अमोल वक्ते, तलाठी पी.एम. भीसे, मंडळ अधिकारी पी.एस.पांडे, वाहनचालक किशोर इंगोले, पोलिस पाटील वासुदेव सोनोने, शिपाई विशाल नप्ते, कोतवाल सुदामा जाधव यांचा समावेश आहे.संचालन नायब तहसीलदार श्रीमती अर्चना घोळवे यांनी तर उपस्थितांचे आभार महसुल तहसिलदार प्रिया सुळे यांनी मानले. सहाय्यक अधीक्षक मिरा पुरोहित, सविता डांगे, सुनील घोडे, विधी अधिकारी महेश महामुनी यांच्यासह विविध विभागाचे तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.