तालुक्यातील मौजा पिपरी देशमुख घाटावर अवैधरीत्या रेती भरत असताना भद्रावती पोलिसांनी धाड टाकून दोन ट्रॅक्टरसह चालक व मालकावर बुधवारी रात्री कारवाई केली.
यातील संदीप नांदे (३६), शुभम पुल्लरवार (२४), प्रशांत मासीरकर (३६), प्रमोद मिटपल्लीवार (२५) अशी आरोपींची नावे आहेत. यातील ट्रॅक्टरमालक संदीप नांदे सुमठाना परिसरात मध्यरात्री आपल्या चारचाकी वाहनाने रेती घाटावर जात असताना पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्यांनी पिपरी देशमुख रेती घाटावर ट्रॅक्टर रेती भरत असल्याची पोलिसांना माहिती दिली. त्या आधारे ठाणेदार बिपीन इंगळे हे आपल्या सहकार्यासोबत रेती घाटावर गेले असता दोन रेती भरलेले ट्रॅक्टर घटनास्थळी आढळून आले. यात दोन टॅक्टर व पायलेटिंगसाठी वापरलेले चारचाकी वाहन असा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.