कारंजा (लाड) : कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील जनतेच्या स्थानिक उमेदवाराच्या मागणीवरून महायुतीमध्ये, भाजपा ह्या राष्ट्रीय पक्षाच्या वाट्याला आलेल्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघामध्ये,महायुतीकडून माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष स्व.प्रकाशदादा डहाके यांच्या अर्ध्यांगीनी तथा कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान महिला सभापती श्रीमती सईताई प्रकाश डहाके यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे शिर्षस्थ नेते असलेल्या देवेन्द्रजी फडणवीस यांचे कारंजा येथे आगमन होत असून,शनिवार दि. 09 नोहेंबर 2024 रोजी दुपारी 01: 30 वाजता,विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर जवळील प्रांगणात विद्याभारती महाविद्यालया समोर कारंजा येथे जाहीर सभा ठेवण्यात आलेली असून,त्यांच्या सभेकरिता नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.श्रीमती सईताई प्रकाश डहाके ह्यांचे बद्दल मतदार संघात स्थानिक महिला नेत्या म्हणून सहानुभूती असून त्यांनी त्यांच्या कतृत्वाने अल्पावधीतच स्थानिक सहकार क्षेत्रावर चांगलीच पकड निर्माण केली असून ग्रामिण भागातूनही त्यांना प्रतिसाद मिळत आहे.कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ गेल्या दहा वर्षापासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून,सदरहु बालेकिल्ला भाजपाकडे म्हणजेच महायुतीकडे अभेद्य रहावा.या दृष्टीने देवेन्द्र फडणवीस आज होणाऱ्या त्यांच्या जाहीर सभेत निवडणूक प्रचारामध्ये कोणती निवडणूक निती वापरतात ?आणि स्थानिक मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टिने कोणती घोषणा करतात ? याकडे कारंजेकर आणि मानोरावासीयांचे व ग्रामिण नागरिकांचे विशेष लक्ष लागले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे यांनी कळविले आहे.