कारंजा (लाड) : संत गाडगेबाबा सहकारी पतसंस्था कारंजाचे संचालक,महाराष्ट्र परिट धोबी समाज संघटनेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व. देविदासजी नांदेकर यांचे अकस्मात आलेल्या आजाराने शनिवार दि.२६ एप्रिल २०२५ रोजी निधन झाले. प्रातःकाळी व्यायाम,धावण्याची तालीम, योगा करीत दिनचर्या सुरु करणारे स्व.देविदासजी नांदेकरांना दिवसभर आपल्या व्यवसायात मग्न असूनदेखील दुपारी १२:०० ते ०२ः०० वाजेपर्यंत वेळ काढून सपत्निक श्री नृसिंह सरस्वती स्वामी संस्थान मध्ये महाप्रसाद कक्षात भाविक भक्तांना वाढण्याची सेवा द्यायचे.त्यानंतर परत अमर चौकातील आपल्या लॉन्ड्री दुकानवर काम करायचे.रात्रीला मित्रमंडळी सोबत तास दोन तास "करावते संगीत रजनी" किंवा भजनाचा आनंद लुटायचे. सदा हास्यमुख,समाधानी,उत्साही व महत्वाचे म्हणजे "माणसांना जोडण्यात तरबेज" असणारे देविदासजी नांदेकर मनमिळाऊ होते. आपल्या घरी सकाळचे जेवण १०:०० ला व रात्रीचे जेवण सायंकाळी ०६:०० पूर्वीच घ्यायचे.बाहेरचे हॉटेलचे पदार्थ त्यांना अजिबात आवडायचे नाहीत. एवढी अचूक त्यांची दिनचर्या होती. त्यांच्या माघारी त्यांना चार मुली व एक मुलगा असून सर्वांना त्यांनी सुशिक्षीत व सुसंस्कारी घडवून स्वतःचे पायावर उभे केले होते. कुटुंबात कर्ते असल्याने आपल्या बहिनींच्या व मुलामुलीच्या विवाहाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून समाजात विशेष नावलौकीक प्राप्त केला होता. एकेकाळी आर्केष्टा चालविणारे देविदास नांदेकर आज रोजी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार,मराठा सेवा संघ प्रणीत संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, ज्ञानगंगा साहित्य मंडळ,संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद, द्वारकामाई संगीत मैफील इत्यादींशी जुळलेले होते. शिवाय हाडाचे सेवाव्रती समाजसेवक होते.त्यामुळे त्यांच्या अकल्पित जाण्याने त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण कारंजेकरांवर शोककळा पसरून प्रत्येकाच्या तोंडून हळहळ व्यक्त होत होती. शनिवारी रात्री ०७ : ०० वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी नातेवाईक, सोयरे, समाजबांधवासह सर्व माजी नगराध्यक्ष, नगरसेवक,राजकिय, सामाजिक,कला क्षेत्रातील शेकडो गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.याप्रसंगी संत गाडगे बाबा सहकारी पतसंस्था,संत गाडगेबाबा विचारमंच बहु उद्देशिय संस्था, विदर्भ लोककलावंत संघटना,श्री गुरुमंदिर संस्थान भक्त मंडळी, द्वारकामाई संगीत मैफील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करीत परमेश्वर त्यांच्या परिवारास दुःखातून सावरण्या करीता शक्ती देवो अशी प्रार्थना केली.