मानाचा गणपती' आणि बाजार समितीच्या 'शेतकऱ्यांच्या राजा'सह कारंजातील गणपती झाले विराजमान.
"कारंजा पोलीस विभागाच्या शहरी क्षेत्रात ५१ तर ग्रामिण क्षेत्रात एकूण ०९ सार्वजनिक गणपती पैकी सात ठिकाणी एक गाव एक गणपती." *कारंजा (लाड) :* कारंजा शहरासह तालुक्यात, बुधवार दि २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पावसाने एका दिवसाची उघाड दिल्यामुळे,सर्वच गणेश मंडळांनी वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाला मंडपात आणले.विशेष म्हणजे गणेश मंडळांनी डिजेचा मोह टाळून पारंपारिक वाद्य वाजवून गणरायाचा आगमन सोहळा हर्षोल्हासात साजरा करून, शांतता व संयम ठेवून विधीवत स्थापना केल्याचे दिसून आले. या संदर्भात अधिक वृत्त असे की,कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 'शेतकऱ्यांचा राजा' ची भव्य मिरवणूक काढण्यात आली असता स्थानिक आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके व त्यांचा संपूर्ण परिवार, लोकनेते स्व.प्रकाशदादा डहाके मित्र मंडळाचे सर्व सदस्य, बाजार समितीचे सदस्य,अडते, व्यापारी,कर्मचारी स्वतः जातीने गणरायांच्या आगमनाला हजर होते. मिरवणूकी मध्ये डिजे सारख्या पाश्चात्य व विदेशी वाद्याचा मोह टाळून त्याऐवजी, महाकाल-शिवगणाचे भजन आणि वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाचे अभंगाचे सप्तसूर प्रसन्नतेने श्रीगणेश भक्तांना मोहीत करीत होते.तर काही गणेश मंडळांनी लेझीम पथक आणि ढोलताशाच्या गजरात श्री गणेशाला मंडपात स्थान्नापन्न केले.कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांचे मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला सर यांनी पोलीस विभाग आणि होमगार्ड पथक यांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता.शिवाय शांतता समन्वय समिती सदस्य आणि पत्रकार बांधव स्वयंसेवा देवून श्री गणेश मंडळाला मार्गदर्शन करीत होते.एकंदरीत कारंजा शहर व ग्रामिण विभागातील श्री गणेश स्थापनेचा सोहळा खूपच हर्षोल्लासात साजरा करून कारंजेकरांनी शहर व तालुक्याचा नावलौकीक वाढविल्याचे दिसून आले. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांना पोलीस विभागाकडून दिलेल्या माहिती नुसार कारंजा शहरात एकूण एक्कावन्न सार्वजनिक गणेशाची तर कारंजा हद्दीतील ग्रामीण क्षेत्रात एकूण नऊ ठिकाणी व त्यापैकी सात ठिकाणी 'एक गाव एक गणपती' स्थापन करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.तसेच येत्या दहा दिवसात श्री गणेश मंडळांनी आपल्या कार्यक्रमामध्ये आध्यात्मिक,पर्यावरण, समाजप्रबोधन, सामाजिक,शैक्षणीक, क्रिडा,आरोग्य,वैधानिक कार्यावर आधारीत कार्यक्रमाला प्राधान्य देण्याचे ठरवीले आहे.