कारंजा : श्री.किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी अंधश्रद्धा निर्मूलन एक वैज्ञानिक दृष्टिकोण या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णप्रभा विद्यालयाचे नरेश जाधव हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक तथा बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक विजय भड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील राठोड यांनी केले. त्यात त्यांनी आधुनिक युगात देखील अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामध्ये सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. विशेषतः समाजातील महिला अंधश्रद्धेला अधिक प्रमाणात बळी पडताना दिसतात. नरबळीचे प्रकार वाढले आहेत, वैज्ञानिकता मागे पडत आहे. समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धेपासून युवकांना बाजूला करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना विजय भड यांनी देशाची प्रगती करायची असेल तर युवकांना पुढाकार घेऊन प्रथम आपले गाव अंधश्रद्धा मुक्त करावे लागेल, त्यानंतरच समाज व देश अंधश्रद्धा मुक्त होऊ शकेल. समाजामध्ये अनेक अनिष्ट प्रथा व रूढी आहेत, त्यामुळे वन्य पशु प्राण्याचे जीवन देखील संकटात सापडले आहे. मांजर आडवे जाणे, घुबडाचे तोंड पाहणे अशुभ मानणे या सर्व गोष्टी अनावश्यक असून विज्ञाननिष्ठा जपण्याचे आवाहन त्यांनी विविध विज्ञान प्रयोगाच्या माध्यमातून केले तसेच समाज प्रगती साठी जादूटोना विरोधी कायदा 2013 कसा उपयोगी आहे,याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.आधुनिक युगात मानव हा चंद्र व मंगळावर जात आहे तरी देखील भारतीय समाज मात्र अंधश्रद्धेच्या आहारी जात जाऊन स्वतःचे व समाजाचे नुकसान करत आहे. युवकांनी स्वप्रगती व समाज प्रगती करीता वैज्ञानिक दृष्टिकोण स्विकारने काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
अध्यक्षीय मनोगतात नरेश जाधव यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करून इतरांनाही प्रेरणा देण्याचे कार्य करण्याचे सांगितले. तसेच अंधश्रद्धा विरुद्ध आवाज उठवण्याचे आव्हान देखील त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कु. रुणाली खिराडे हिने तर उपस्थितांचे आभार कु. वैशाली गांजरे हिने मानले.